महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनावर चिंतेचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनावर चिंतेचे सावट
महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनावर चिंतेचे सावट

महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनावर चिंतेचे सावट

sakal_logo
By

महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनावर चिंतेचे सावट
---
बरखास्तच्या निकालाची पार्श्‍वभूमी; महासंघ सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनावर पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. उच्च न्यायालयाने राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने निकाल दिला असला, तरी भारतीय कुस्ती महासंघ सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे. कुस्तीगीर परिषद मात्र वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन डिसेंबरमध्ये अधिवेशन घेण्याच्या तयारीला लागली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेने महासंघाच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवत, परिषद बरखास्त केली होती. तसेच, अस्थायी समितीची स्थापनाही केली. या समितीने डिसेंबरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनाची घोषणा केली असताना, कुस्तीगीर परिषदही अधिवेशन घेण्याच्या आखाड्यात उतरली. त्यातून पैलवानांतील संभ्रम वाढला. परिणामी, अधिवेशन घेण्याचा अधिकार अस्थायी समिती की परिषदेला असा प्रश्‍न आकाराला आला होता. कुस्तीगीर परिषद की अस्थायी समिती अधिकृत यावरही कुस्ती क्षेत्रात चर्चा रंगली. उच्च न्यायालयाने त्यासंदर्भात निर्णय देताना राज्य कुस्तीगीर परिषदेला कौल दिला. परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने निकाल लागला. श्री. लांडगे परिषदेलाच अधिवेशन घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत होते; तर अस्थायी समिती महासंघाच्या निर्देशाप्रमाणे पावले उचलत होती.
परिषदेच्या बाजूने निकाल लागल्याने पदाधिकाऱ्यांत उत्साह आहे. अधिवेशनाच्या अनुषंगाने त्यांनी पवित्रा घेतला. महासंघ सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार असल्याने त्याला किती काळ लागेल, या विचाराने कुस्ती क्षेत्रात चिंता आहे. महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन कधी होईल, याची पैलवानांत चर्चा सुरू झाली. अधिवेशनासाठी त्यांचा कसून सरावही सुरू आहे.
लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘उद्या (ता. ११) पत्रकार परिषदेत आम्ही पुढची दिशा ठरविणार आहोत. वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन महाराष्ट्र केसरी अधिवेशनाची तारीख निश्‍चित केली जाईल.’’ भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीचे सदस्य योगेश दोडके म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने निकाल दिला असला, तरी भारतीय कुस्ती महासंघ सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.’’