पर्यटन मालिका भाग ९ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन मालिका भाग ९
पर्यटन मालिका भाग ९

पर्यटन मालिका भाग ९

sakal_logo
By

पर्यटन मालिका...

स्वच्छतागृहांची नुसतीच चर्चा, वर्षानुवर्षे दुखणे कायम
---
स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष; ‘बीओटी’ने केला घात
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्हाभरात पर्यटनासाठी येणाऱ्या असंख्य पर्यटक व भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत चालढकल ही अक्षम्य अपराधी भावना निर्माण करणारी आहे. स्वच्छतागृहांची गैरसोय अनेक पातळ्यांवर चर्चा होऊनही वर्षानुवर्षाची उणीव कायम आहे. टीका झाली की कुठल्या तरी कोपऱ्यातील एखादी सुविधा दाखवायची आणि शासकीय यंत्रणेने एकमेकांकडे जबाबदारीचे बोट दाखवायाचे, असा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्याच हस्तक्षेपाने थांबू शकतो. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन सुस्तावलेल्या यंत्रणांना जागे करण्याची गरज आहे.
जिल्हाभरात रोज सरासरी ५० हजारांवर भाविक पर्यटक कोल्हापुरात येतात. सुटीच्या काळातही संख्या दीड लाखाच्या घरात जाते. यातील ७० टक्के पर्यटक अंबाबाई मंदिर परिसरात येतात. दर्शन घेतल्यावर शहरातील प्रेक्षणीय स्थळे पाहतात. रात्री काही जण मुक्काम करतात. बहुतांश पुढे निघतात. एका पर्यटक कुटुंबाचे किमान आठ तास ते २४ तासांचे येथील सान्निध्यात असते. पर्यटक फिरता राहतो. पर्यटक हे बाहेरच्या जिल्ह्यात आलेले असतात. अशा वेळी पर्यटकांना नैसर्गिक गरजेनुसार स्वच्छतागृहाची आवश्यकता असते. मात्र, त्या सेवेची कमतरता येथे प्रखरतेने जाणवते. महिला, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना नाईलाजाने गलिच्छ सुविधेचा वापर करावा लागतो. फक्त स्वच्छतागृह वापरण्यासाठी खासगी हॉटेलमध्ये सोय मिळत नाही. हे चित्र पर्यटनस्थळ असणाऱ्या रंकाळा चौपाटी, मंदिर परिसरात ठळक आहे. शिवाय, त्र्यंबोली टेकडीवरही असेच चित्र आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर स्वच्छतागृहे नाहीत. बिंदू चौकात पार्किंग परिसरात पर्यटक भाविकांची मोठी गर्दी असते. नेमके याच परिसरात स्वच्छतागृहाची कमतरता आहे. परिणामी, अनेकदा महिला पर्यटकांना शेजारपाजारच्या घरांत स्वच्छतागृहाबाबत चौकशी करावी लागते. पुढारलेल्या पुरोगामी शहरात यासारखे दुर्दैव नाही.
अशीच अवस्था जिल्‍ह्यातील अन्य पर्यटनस्थळांवर आहे. पन्हाळ्यात दोनच ठिकाणी स्वच्छतागृहांची चांगली सुविधा आहे. पण, ते गर्दीच्या ठिकाणांपासून दूरवर आहेत. जोतिबा डोंगरावर सुविधा आहे; पण अपुरी व गलिच्छच आहे. रामलिंग, आजरा, रामतीर्थ धबधबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर मंदिर, दाजीपूर, गगनबावडा घाटमार्गाजवळील चौकात अशा ठिकाणी पर्यटकांच्या गाड्या चहापानासाठी थांबतात. पण, तेथेही स्वच्छतागृहाची सोय नाही.
स्वच्छतागृहाची सुविधा करणे, दोन कर्मचारी नियुक्ती करणे स्थानिक स्वराज्य संस्थांना शक्य आहे. पण, बहुतांश ठिकाणी ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर सुविधा दिली जाते. ही सुविधा बहुतांश ठिकाणी सुलभ कंपनीलाच मिळते. त्यात पैसे घेऊनही गलिच्छ सेवा पुरवली जाते. अशी जिल्ह्यात जवळपास १५ ते १६ उदाहरणे आहेत. प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेने अशी सोय दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत येथील गैरसोयीची माहिती पोचत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था अशा गोष्टीकडे फारशा गांभीर्याने पाहत नसल्याचे जाणवते.
-------------
शहरात सेन्सर स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी
मोबाईल स्वच्‍छतागृह गर्दीच्या दिवशी ठेवावेत
पुरेशा प्रमाणात पाणी व स्वच्छता ठेवावी
पैसे घ्यावेत; पण सुविधा चांगली, स्वच्छ असावी
रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू असणे महत्त्वाचे