ग्रामपंचायत राजकारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत राजकारण
ग्रामपंचायत राजकारण

ग्रामपंचायत राजकारण

sakal_logo
By

आजी-माजी आमदार येणार आमने-सामने
-
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून घालणार लक्ष

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः विधानसभेची रंगीत तालीम असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी आमदार आमने-सामने येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची निवडणूक असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचे वर्चस्व रहावे यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर या घडामोडींना वेग येणार आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचयातीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा बुधवारी आयोगाने केली. यात जिल्ह्यातील बहुंताशी मोठ्या गावांचा समावेश आहे. विधानसभेच्या निवडणुकीत या मोठ्या गावांचा कौल निर्णायक असतो, म्हणूनच अशा मोठ्या गावांवर विद्यमान व माजी आमदारांचा डोळा रहाणार आहे. पक्षीय पातळीवर अपवादानेच होणाऱ्या या निवडणुकीत गावांवर आपल्या गटाचे वर्चस्व राहील अशा जोडण्या नेत्यांच्या असतील.
अन्य मतदारसंघाच्या तुलनेत करवीर, कोल्हापूर दक्षिण, राधानगरी, कागल या मतदारसंघात या निवडणुकीतील चुरस अधिक असणार आहे. अलीकडेच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट व उद्धव ठाकरे गट अशी शिवसनेची विभागणी झालेली आहे. राधानगरी, शिरोळ, शाहूवाडी तालुक्यात या दोन गटांत वर्चस्वाची लढाई असणार आहे. आपल्या गटाचे जास्तीत जास्त सदस्यांसह सरपंच कसे निवडून येतील यासाठी आजी-माजी आमदारांना पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे.
निवडणूक होणारी बहुंताशी गावे ही विधानसभेचा निकाल फिरवणारी आहेत. या गावांवर ज्यांचे वर्चस्व त्यांचा विधानसभेतील विजय सुकर असे गणित आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्वाचीही या निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. करवीर मतदारसंघातील सडोली, सांगरूळ, वडणगे, प्रयाग चिखली, भुये या मोठ्या गावांत निवडणुका आहेत. तिथे पी. एन. पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके असा सामना पाहायला मिळेल. कोल्हापूर दक्षिणमधील सतेज पाटील, ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक यांच्यात अस्तित्त्वाची लढाई असेल. या मतदारसंघातील कळंबा, उचगाव, पाचगाव, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, कावणे अशा मोठ्या गावांची निवडणूक होत आहे. हातकणंगले तालुक्‍यात आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, माजी आमदार अमल मडाडिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे गट वर्चस्वाठी लढतील.
राधानगरीत शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध राष्ट्रवादी, शाहूवाडीत आमदार कोरे विरुद्ध सत्यजित पाटील, शिरोळमध्ये शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध अन्य सर्वजण, आजरा, चंदगड गडहिंग्लजमध्ये आमदार राजेश पाटील विरुद्ध जनता दल, शिवसेना अशी लढत राहील. सर्वच विधानसभा मतदारसंघात त्या मतदार संघाचे आमदार व माजी आमदार यानिमित्ताने आमने-सामने येणार आहेत.

चौकट
सरपंच निवड थेट मतदारांतून
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सरपंचपदाची निवडणूक सदस्यांमधून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा निर्णय बदलून सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा कायदा केला. त्यामुळे जास्तीत जास्त सरपंच आपले निवडून येतील यासाठीही शिंदे, ठाकरे गटांबरोबरच राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्तीपक्षाचे प्रयत्न असतील.