रोज एका भुकेल्याची भागते भुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोज एका भुकेल्याची भागते भुक
रोज एका भुकेल्याची भागते भुक

रोज एका भुकेल्याची भागते भुक

sakal_logo
By

61616
टिफीन देताना नेहा मिश्रा.

रोज एका भुकेल्याची भागते भुक
नेहाज किचनचा उपक्रम; एक डबा गरजूंकरिता; व्यवसाय करत बांधिलकीची जपणूक
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : एखादा छोटासा व्यवसाय करताना तो पुर्णपणे नफ्यासाठी न करता त्यातून एखादे सत्कार्यही घडावे, यासाठी काही व्यावसायिक प्रयत्नशील असतात. यापैकीच एक म्हणजे नेहा आणि मनिष मिश्रा हे दांम्पत्य. त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय. लोकांच्या आवडीप्रमाणे रूचकर जेवण बनवून देणे, हा त्यांच्या व्यवसायाचा मुळ ढाचा. हा व्यवसाय करतानाही रोज एका गरजूला पौष्टिक जेवणाचा डबा देतात. यंदा त्यांच्या ‘नेहाज किचन’ला दोन वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांनी १५ ऑगस्टपासून या उपक्रमाला सुरूवात केली आहे. दिवसातून कमीत कमी एका गरजूला असा पौष्टिक जेवणाचा डबा ते मोफत पुरवितात आणि भुकेल्याची भुक शमवितात.
मनिष आणि नेहा मिश्रा यांनी कोविड संसर्गाच्या काळात ‘नेहाज किचन’ या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली. यामध्ये दाक्षिणात्य, महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थ ऑर्डर्सप्रमाणे बनवून देण्यास सुरूवात केली. लोकांना कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त पदार्थ आणि तेही गुणवत्तापुर्ण कसे देता येतील, याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे तरीही चविष्ट आहार गरजेचा होता. ही बाब त्यांनी लक्षात घेतली. त्याप्रमाणे त्यांनी कोविड रूग्णांनाही जेवणाचे डबे पुरविले. त्याचप्रमाणे त्यांच्या व्यवसायाला दोन वर्षे पुर्ण होतानाच त्यांनी रोज एका भुकेल्यासाठी मोफत जेवणाचा डबा हा उपक्रम सुरू केला. त्यामाध्यमातून वटेश्वर मंदिर येथील निराधार व्यक्ती, रेल्वे स्टेशन परिसरातील गरजू व्यक्तींना डबा पुरविला जातो. त्याचपद्धतीने शिक्षण घेत असलेल्या मात्र गरजू विद्यार्थ्यांनाही हा डबा पोचविला जातो. भविष्यात सामाजिक संस्थांच्या मदतीने आणखी गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना हा डबा देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
--------
चौकट
समाजातील दानशुर व्यक्तींचेही बळ
या उपक्रमाला सुरूवात झाल्यापासून शहरातील दानशुर व्यक्तींनीही याला बळ दिले. नेहाज किचन देत असलेल्या एका डब्याचा खर्च शंभर रूपये आहे. या दानशुर व्यक्ती यापैकी पन्नास रूपये देतात व उरलेले पन्नास रूपये नेहाज किचन घालते आणि आणखी एका भुकेल्या व्यक्तीची भुक भागली जाते.
------
कोट
समाजामुळेच आपण आहोत. त्याच समाजाचे आपण काही देणे लागतो, यासाठी आपल्याला झेपेल तितकी मदत आपण नक्कीच करू शकतो. कोणताही प्रयत्न छोटा असतो, मात्र त्यातून मिळणारे यश मोठे असते. त्याचप्रमाणे आमच्या या उपक्रमाला यश मिळत असून आम्ही देत असलेला एक डबा आणि दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून अजून काही डबे आम्ही गरजूंना देत आहोत.
- मनिष व नेहा मिश्राd