''दौलत'' कारखान्याची पाचवी बैठक निष्फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''दौलत'' कारखान्याची पाचवी बैठक निष्फळ
''दौलत'' कारखान्याची पाचवी बैठक निष्फळ

''दौलत'' कारखान्याची पाचवी बैठक निष्फळ

sakal_logo
By

61625

''दौलत''ची पाचवी बैठक निष्फळ
आमदार मुश्रीफ यांची शिष्‍टाई निरुपयोगी; कामगार, प्रशासन भूमिकेवर ठाम

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना (चंदगड) भाडेकरारावर अथर्व कंपनीने चालविण्यास घेतला आहे. मात्र, कारखान्यातील कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थानामध्ये काही महिन्यांपूर्वी वादाची ठिणगी पडली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामगृहात कामगार युनियन व कंपनी व्यवस्थापनाची बैठक झाली. मात्र, कामगार व अथर्व कंपनी व्यवस्थापन आपल्याच मुद्यावर ठाम राहिल्याने आमदार मुश्रीफ यांची शिष्ठाई निष्फळ ठरली.
दौलत कारखाना ३९ वर्षांच्या लिजवर अथर्व कंपनीस भाडेतत्त्‍वावर चालविण्यास दिला आहे. सलग दोन गळीत हंगाम सुरळीत पार पडले. मात्र, यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कंपनी व्यवस्थापन व कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. तो अधिकच वाढत जाऊन आंदोलन चिघळले. यात कामगारांनी कारखान्यावर दगडफेक केली. त्यामुळे ५९ कामगारांना व्यवस्‍थापनाने निलंबित केले. हा वाद वाढल्याने अर्थवने गळीत हंगाम सुरू करण्यास नकार दिला. कारखाना सुरू करावा, यासाठी सतत बैठका सुरू आहेत. मात्र त्यातून मार्ग निघाला नसल्याने आज आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कामगार, शेतकरी व अर्थव कंपनी व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक झाली.
तब्बल चार तास चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. कामगार नेते सुभाष जाधव यांनी कामगारांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले, तर मानसिंगराव खोराटे यांनी १७ कामगारांना वगळून उर्वरित ५३६ कामगारांनी कामावर हजर राहून गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार गोपाळराव पाटील, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर उपस्थित होते.
......

चौकट

कर्मचाऱ्यांना घरात बसून
पगार देण्याची तयारी

बैठकीत कामगारांचं निलंबन मागे घ्यावे, वेतन करार करावा आदी मागण्या कामगार संघटनेने केल्या. यावर व्यवस्‍थापनाने निलंबन मागे घेण्याची तयारी दर्शविली. मात्र ५९ पैकी १७ कामगारांना प्रत्यक्ष कामावर हजर करून घेण्यास तीव्र विरोध केला. हे करत असताना संबंधित कर्मचाऱ्यांना घरबसल्या १०० टक्के पगार देण्याची तयारी अर्थवचे मानसिंगराव खोराटे यांनी दाखविली. तसेच आर्थिक मागण्यासंदर्भात महिन्यानंतर करार करू, असे त्यांनी सांगितले.