किरणोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरणोत्सव
किरणोत्सव

किरणोत्सव

sakal_logo
By

61620

मावळतीची सूर्यकिरणे
मूर्तीच्या गळ्यापर्यंत

अंबाबाई मंदिर किरणोत्सव, आज किरणे मुखापर्यंत पोहोचण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली. दरम्यान, मंदिराबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून भाविकांचा किरणोत्सव सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पाच वाजून एक मिनिटांनी सूर्यकिरणांनी महाद्वार गेटजवळ प्रवेश केला. त्यानंतर वीस मिनिटांनी पाच वाजून २४ मिनिटांनी गणपती मंदिर पाठीमागील बाजूस, कासव चौकात पाच वाजून एकतीस मिनिटांनी तर कटांजनापर्यंत पाच वाजून ४३ मिनिटांनी सूर्यकिरणे पोहोचली. पाच वाजून ४४ मिनिटांनी चरणस्पर्श करून पुढे दोन मिनिटांनी मूर्तीच्या कमरेपर्यंत तर पाच वाजून ४८ मिनिटांनी किरणे गळ्यापर्यंत पोहोचली आणि डावीकडे लुप्त झाली. किरणोत्सव मार्गातील धुलीकणांचा अडथळा कमी असून, किरणांची तीव्रता अधिक आहे. त्याशिवाय आकाशही निरभ्र आहे. उद्या (शुक्रवारी) मूर्तीच्या चेहऱ्यावर सोनसळी अभिषेक होण्याची शक्यता असून, भाविकांतून समाधान व्यक्त होत असल्याचे विवेकानंद कॉलेज खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.
........
ठळक चौकट

श्री अंबाबाई चरणी
भाविकांचे कोट्यवधींचे दान

लॉकडाउननंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाईला दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. दिवाळीच्या सुटीत तर अक्षरशः मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. साहजिकच त्यानंतर आता भाविकांनी दान केलेल्या रकमेची मोजदाद सुरू झाली असून, दोन दिवसांत एक कोटीहून अधिक रक्कम भाविकांनी दान केल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारपासून देणगी पेट्या मोजदादीसाठी उघडल्या असून, पहिल्या दिवशी ४९ लाख, ९६ हजार ६५३ रुपयांची मोजदाद पूर्ण झाली तर गुरुवारी ६२ लाख ८९ हजार ४२० इतकी रक्कम मोजून पूर्ण झाली. आणखीन काही पेट्यांतील रकमेची मोजदाद उद्या (शुक्रवारी) होणार आहे.