संभाव्य हद्दवाढीतील गावांत निवडणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाव्य हद्दवाढीतील गावांत निवडणुका
संभाव्य हद्दवाढीतील गावांत निवडणुका

संभाव्य हद्दवाढीतील गावांत निवडणुका

sakal_logo
By

संभाव्य हद्दवाढीतील गावांत निवडणुका
प्रश्‍न पुन्हा लटकणार; तीन महिन्यांपासून चर्चाच नाही
कोल्हापूर, ता. १० ः कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभाव्य गावांच्या निवडणुकाच जाहीर झाल्याने हा प्रश्‍न पुन्हा लटकण्याची भिती आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपुर्वी यावर निर्णय व्हावा म्हणून हद्दवाढ समर्थक कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तीन महिने झाले, पण त्यावरही चर्चा झालेली नाही.
राज्यातील सात हजार ७५० ग्रामपंचयातीच्या निवडणुका काल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्यात जिल्ह्यातील ४७५ गावांचा समावेश आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून शहराची हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ न झाल्याने केंद्र सरकारच्या अनेक योजनांपासून शहर वंचित रहात आहे. गेली अनेक वर्षे यावर शहरात आंदोलने झाली, बैठका झाल्या पण राजकीय नेतृत्त्वाच्या उदासिन व बोटचेपी भुमिका यामुळे हा प्रश्‍न लटकत पडला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी ४२ गावांसाठी प्राधिकरण झाले, पण तेही कागदोपत्रीच आहे, प्रत्यक्ष या प्राधिकरणामुळे कामे झालीत असा अनुभव नाही.
अलिकडेच शहराशी भौगोलिक संलग्नता असलेल्या पाच गावांचा पहिल्या टप्प्यात हद्दवाढीत समावेश करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचेही पुढे काही झाले नाही. हद्दवाढ समर्थक कृती समितीने यावर वारंवार बैठका, आंदोलने केली पण त्याचीही दखल घेतली नाही. तोपर्यंत हद्दवाढीत सहभागी होणारी कळंबा, उचगांव, पाचगांव, गोकुळ शिरगांव, मोरेवाडी, कंदलगांव या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाच जाहीर झाल्या. महापालिकेची निवडणूक जवळपास दोन वर्षे लांबलेली आहे. ही निवडणूक होण्यापुर्वी शहराशी भौगोलिक संलग्नता असलेल्या गावांचा हद्दवाढीत समावेश करून त्याला मुर्त स्वरूप देण्याची आवश्‍यकता होती. पण आता हद्दवाढीत येणाऱ्या संभाव्य गावांच्या निवडणुकाच जाहीर झाल्याने या प्रश्‍नाला पुन्हा खीळ बसण्याचा धोका आहे.
---------------
कोट
करवीर तालुक्‍यातील ५३ गावांच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यात हद्दवाढीत येणाऱ्या काही गावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे हद्दवाढीच्या चर्चेसाठी वेळ मागितली होती, हा अर्ज नगरविकास विभागाकडे पाठविला. त्यावर गेल्या तीन महिन्यात निर्णय झालेला नाही. प्रशासक यावर काही बोलत नाहीत आणि शहरात लोकप्रतिनिधी यावर तोंड उघडत नाहीत. निवडणुकामुळे ही हद्दवाढच होणार नाही.
- ॲड. बाबा इंदूलकर, हद्दवाढ समर्थक कृती समिती