संकेश्वर-बांदा महामार्गाबाबत स्पष्टता द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकेश्वर-बांदा महामार्गाबाबत स्पष्टता द्या
संकेश्वर-बांदा महामार्गाबाबत स्पष्टता द्या

संकेश्वर-बांदा महामार्गाबाबत स्पष्टता द्या

sakal_logo
By

61716
-------------------------
संकेश्वर-बांदा महामार्गाबाबत स्पष्टता द्या
संपत देसाईचे आवाहन ः आजऱ्यात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ ः संकेश्वर बांदा रस्त्याबाबत शासनाने कोणतीही स्पष्टोक्ती दिलेली नाही. एखादा प्रकल्प होत असला तर त्याबाबत नोटिफिकेशन काढणे आवश्यक असते. या रस्त्याबाबत शेतकरी, शहरातील नागरिक यांना शासनाकडून गाफिल ठेवले जात आहे. या प्रकल्पाबाबत शासनाने स्पष्टता द्यावी. होणाऱ्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संपत देसाई यांनी दिला.
येथील किसान भवनात संकेश्वर-बांदा महामार्गबाधित शेतकऱ्यांची सर्वपक्षीय बैठक झाली. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, आप्पासाहेब पाटील, निवृत्ती कांबळे, युवराज पोवार, अनिकेत कवळेकर, शांताराम पाटील, मुकुंद तानवडे, गणपतराव डोंगरे, दत्तात्रय मोहिते व सुरेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘कोणताही प्रकल्प होताना यासाठीचे भूसंपादन व प्रकल्पबाधित शेतकरी याबाबत धोरण जाहीर करायला हवे होते. या महामार्गाबाबत कोणतीही स्पष्टता शासनाने दिलेली नाही. सर्वांना गाफिल ठेवण्याचे शासनाची भूमिका दिसून येत आहे. या प्रकल्पाबाबत स्पष्टता जाहीर न केल्यास संघटित लढा देऊ. रस्ते हा प्रकल्प देखील व्यावसायिक आहे. टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रत्येकाला दहापटीने नुकसान भरपाई मिळायला हवी.’’
निवृत्ती कांबळे म्हणाले, ‘‘वाडवडिलांनी बांधावर लावलेली झाडे रस्त्याच्या नावाखाली पळवली आहेत. शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतली जात आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे.’’ शांताराम पाटील म्हणाले, ‘‘जोपर्यंत शेतकरी लढाईला तयार होत नाही तोवर अन्याय होत राहणार. संघर्ष करायला तयार रहा.’’ युवराज पोवार, सुधीर देसाई, आप्पासो पाटील, डॉ. धनाजी राणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश मोरजकर यांनी स्वागत केले. दरम्यान, येथील तहसीलदार कार्यालयात भुदरगड आजराच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. श्रीमती बारवे यांनी याबाबत तातडीने बैठक लावणार असल्याचे सांगीतले. सुनील डोंगरे, दिनेश कांबळे, शांताराम हरेर, रामा शिंदे, धोंडिबा परीट, भागवत पाटील, गणपतराव येसणे उपस्थित होते.
---------------
बैठकीतील मागण्या
- २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई नको, मुंबई नागपूर झालेल्या समृद्धी मार्गाप्रमाणे बाधितांना दहापट नुकसान भरपाई मिळावी, स्थानिकांना टोल आकारू नये, लेखी द्यावे,
टोल नाक्यावर बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्यावी.