Farmer Protest : स्‍वाभिमानीचे दोन दिवस उस तोड बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer protest
स्‍वाभिमानीचे दोन दिवस उस तोड बंद आंदोलन

Farmer Protest : स्‍वाभिमानीचे दोन दिवस उस तोड बंद आंदोलन

कोल्‍हापूर : ऊस उत्‍पादकांना दोन टप्प्यातील एफआरपी देण्याऐवजी एकरकमी एफआरपी द्यावी. यासाठीचा कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा. तसेच, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात १७ व १८ रोजी सलग दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्‍थित होते.

श्री. शेट्टी म्‍हणाले, साखरेची किमान विक्री किंमत ३१ वरून ३५ रुपये करणे आवश्यक आहे. तसेच इथेनॉल निर्मिती खर्च वजा करून राहणाऱ्या र‍कमेतील ७० टक्‍के रक्‍कम शेतकऱ्यांना द्यावी, सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, खुल्या साखर निर्यात धोरणांतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. वजनकाट्यांबात तक्रारी येत आहेत. त्यामुळे राज्यातील २२५ पेक्षा अधिक साखर कारखान्यांचे काटे संगणकीकृत करण्याची मागणी करण्यात आली होती. यामध्ये सकारात्‍मक निर्णय होण्याची शक्यता आहे. तांत्रिक समितीच्या माध्यमातून याबाबतचे नियोजन होणार असून, असे झाले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, असेही श्री. शेट्टी यांनी सांगितले. १७ व १८ या दोन दिवशी शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत.

तसेच कारखानदारांनीही दोन दिवस तोडणी बंद ठेवावी. या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबर साखर उद्योगाच्या हितासाठी सरकारला इशारा द्यावा, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी यावेळी केले. हिशेब तपासणारी समितीच कार्यान्वित नाही गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी एफआरपीसह दोनशे रुपये ज्यादा देण्यासाठी आम्ही कारखान्यांचे ऑडिट करण्यासाठी आयुक्तालयाला सांगितले होते. आयुक्तालयानेही कारखान्यांना याबाबत कल्पना दिली. मात्र, अनेक कारखान्यांनी हा हिशेब सादर केला नाही. ज्या कारखान्यांनी हा हिशेब सादर केला ते कारखाने शॉर्ट मार्जिनमधून बाहेर पडल्याचे दिसत आहे. हा हिशेब तपासणारी ऊस समिती अद्याप कार्यान्वित नाही. यामुळे गेल्या हंगामातील दोनशे रुपये रखडले असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.