जादा दरांच्या निविदांचे ‘गौडबंगाल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जादा दरांच्या निविदांचे ‘गौडबंगाल’
जादा दरांच्या निविदांचे ‘गौडबंगाल’

जादा दरांच्या निविदांचे ‘गौडबंगाल’

sakal_logo
By

लोगो - जिल्‍हा परिषद

जादा दरांच्या निविदांचे ‘गौडबंगाल’
जल जिवन मिशनचा कारभार; प्रक्रियेत ना पारदर्शकता, ना स्‍पर्धा
सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १२ : जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन योजनेतून १२०० गावांमध्ये पाणी योजना करण्याचे नियोजन आहे. मात्र या योजनांचा निविदा प्रक्रियेत ना पारदर्शकता आहे, ना स्‍पर्धा. सर्व निविदा प्रक्रिया ही संगनमताने सुरू आहे. त्यामुळेच एकही निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने भरलेली नाही. उलट या निविदा १४.९० टक्‍के जादा दराने भरलेल्या आहेत. जादा र‍कमेसाठी ५ ते १० टक्‍के कमीशन देऊन, उर्वरित रक्‍कम हडप करण्याचा डाव संगनमताने सुरू आहे. सध्या ५५० पेक्षा अधिक गावात योजनांची कामे सुरू आहेत. यातील अनेक गावात निकृष्‍ट दर्जाचे साहित्य वापरून काम सुरू असल्याच्या तक्रारीही सुरू झाल्या आहेत.
योजनेअंतर्गत जिल्‍ह्यात १२०० पाणी योजना होणार आहेत. या सर्व योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्‍ट आहे. गावात एकदा पाणी योजना घेतल्यानंतर पुढील ३० वर्षे दुसरी योजना मंजूर होणार नाही. त्यामुळे या योजनेचे काम चांगल्या पद्ध‍तीने होणे आवश्यक आहे. मात्र योजनेच्या मंजुरीपासूनच कामकाजात पारदर्शकता पहायला मिळत आहे. कंत्राटदारांची क्षमता नसताना अधिकची कामे देणे, कामात स्‍पर्धा न होणे, निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा जादा दराने भरणे व त्या मंजूर करणे, जिओ टॅगिंग करणे हा सर्व प्रकार भ्रष्‍टाचाराकडे जाणार आहे. केवळ योजना वेळेत मंजूर करण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्‍टी घडत असल्याने या योजनेचा फुगा पुढील काही महिन्यात फुटल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे जागृत लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी याप्रकरणी आवाज उठवणे आवश्यक आहे.
----------------
कोट
जल जीवन मिशन योजना बहुतांश गावांना गरज नसतानाही केवळ कंत्राटदारांसाठी राबवली जात आहे. जिल्‍ह्यातच नव्‍हे तर राज्यात अशीच परिस्‍थिती आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी दिला जात आहे. मात्र केवळ पैसे उधळण्याचाच प्रकार सुरू आहे. पूर्वी मंजूर झालेल्या योजनांची कामे अर्धवट असताना नव्याने योजना मंजूर केल्या आहेत. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची भेट घेऊन या योजनांच्या चौकशीची मागणी करणार आहे.
- नाथाजी पाटील, भाजप संघटन मंत्री
----------
दृष्‍टिक्षेपात
- सर्व निविदेत तीनच कंत्राटदार
- १० कंत्राटदारांच्या ताब्यात योजना
- गावोगावी पोटकंत्राटदारांची नेमणूक
- अंदाजपत्रकीय दरापेक्षा जादा दर
--------------
निकृष्‍ट दर्जाच्या साहित्याचा वापर
जल जीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाईपचा वापर केला जात आहे. मात्र अनेक गावात दुय्‍यम दर्जाची पाईप वापरली जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच या पाईपवरती आयएसआय मार्क तसेच मोठ्या कंपन्यांचे शिक्‍के मारुन लूट सुरू आहे. खुदाईतही मातीच्या ऐवजी मुरुमाची नोंद करुन पैसे उकळले जात आहेत. या योजनांच्या अंदाजपत्रकापासून ते अंमलबजावणीपर्यंत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळेच ग्रामस्‍थांनीही योजनेवर लक्ष देणे आवश्यक असून सुरू असलेल्या योजनांची चौकशी करणे आवश्यक आहे.