दूधगंगा नदीतून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूधगंगा नदीतून
दूधगंगा नदीतून

दूधगंगा नदीतून

sakal_logo
By

62380,62381
...........

...तर जिल्हाधिकाऱ्यांनाही कोंडून घालू

दूधगंगा बचाव कृती समिती ः सुळकूड योजनेला विरोधासाठी धडक मोर्चा

कोल्हापूर, ता. १४ : दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा केल्यास तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही कोंडून घातले जाईल. जो नेता या योजनेला खतपाणी घालेल, त्यांच्या घरावर मोर्चा काढू. जबरदस्तीने दूधगंगेचे पाणी घेऊन जात असतील तर पाण्याऐवजी रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दूधगंगा बचाव कृती समिती व संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आज दिला आहे. दरम्यान, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यानचा रस्ता दणाणून गेला.
सुळकूड (ता. कागल) येथून दूधगंगा नदीतील पाणी इचलकरंजीला दिले जाणार आहे. यामुळे कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, निपाणी व चिक्कोडी तालुक्‍यातील शेतकरी व ग्रामस्ंथाना पाणीटंचाईला सामोरे जायला लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून या निर्णयाचा निषेध केला. कोणाच्याही नेतृत्वाशिवाय काढलेल्या या मोर्चाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने गोरगरीब शेतकरी आणि नागरिकांची थट्टा केली आहे. विनंती किंवा आवाहन करून हे लोक ऐकणार नाहीत. त्यामुळे इचलकरंजीला पाणी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले पाहिजे. या योजनेला ज्या-ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे, त्या नेत्यांच्या घरावरही मोर्चा काढला पाहिजे.
भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यास विरोध नाही. मात्र, तो पाणीपुरवठा दूधगंगा नदीतून करण्याऐवजी इतर ठिकाणाहून केला पाहिजे. काळम्मावाडी धरणासाठी अनेक लोकांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्याच लोकांना व शेतकऱ्यांना भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये. दूधगंगेचे विषय हा घरचा विषय आहे. त्यामुळे या नदीतून एक थेंबही इचलकरंजीला दिला जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
‘गोकुळ’चे माजी संचालक अंबरिष घाटगे म्हणाले, प्रशासनाने लोकभावनेचा आणि वास्तव परिस्थितीचा विचार केला पाहिजे. कोणी तरी सांगतो म्हणून काहीही योजना राबवू नका. सत्तेच्या जोरावर जर कोणी दूधगंगा परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असेल तर ते खपवून घेणार नाही.
यावेळी बाबासाहेब पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचीही भाषणे झाली.
......

कोणाचेही पाणी कमी होणार नाही : जिल्हाधिकारी
दूधगंगा नदीतून पाणीपुरवठा केल्यामुळे कोणाचेही पाणी कमी होणार नाही. अद्याप त्याचा अंतिम आराखडा तयार करायचा आहे. तो आराखडा आल्यानंतर पंचगंगा नदीऐवजी दूधगंगा नदीतून पाणी उपसा का केला जाणार, याची माहिती द्यावी लागेल. जर योग्य माहिती दिली नसेल तर ती योजना रद्द होईल. तसेच, जर या योजनेमुळे सर्वांनाच पाणी मुबलक मिळणार असेल तर ही योजना राबवली जाईल. त्यामुळे लगेच यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यामुळे काही काळ वाट पहावी आणि निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.