कृषी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी कार्यशाळा
कृषी कार्यशाळा

कृषी कार्यशाळा

sakal_logo
By

62403
कोल्हापूर : कृषी विपणन राष्ट्रीय परिषदेत बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई.
......................

कृषीक्षेत्रात प्रभावी विपणन हवे
डॉ. अशोक दलवाई; विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ
कोल्हापूर, ता. १४ : कृषीक्षेत्रात प्रभावी विपणनाचा अवलंब करून शेतकऱ्यांना लाभ द्यायचा झाल्यास शाश्वत पर्यावरणासह शाश्वत आर्थिक स्थैर्य देण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन भारत सरकारचे केंद्रीय सचिव व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्ज्ञ अधिविभाग व हैदराबादच्या दि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल मार्केटिंग (आयएसएएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी विपणन’ विषयावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. राजर्षी शाहू सभागृहात परिषदेचे आयोजन केले आहे.

डॉ. दलवाई म्हणाले, ‘‘कृषी क्षेत्रात विपणन एकल खरेदी-विक्रीची क्रिया नसून ती बहुस्तरिय पद्धती आहे, हे लक्षात घेऊन नियोजन करायला हवे. कृषी व्यवसाय आहे. व्यवसाय म्हटला की, त्यात नफा वाढवत जाणे आणि तोटा कमी करीत जाणे अभिप्रेत असते. अन्यथा दुकान बंद करावे लागते. या व्यवसायाला फायद्यात आणून शाश्वत बनवावयाचे तर त्याचे उत्पादन भरीव आणि चांगले मिळणे आवश्यक असते. त्याची खरी किंमतही नफ्यासह मिळायला हवी. म्हणून येथे विपणनाच्या पद्धती अवलंबायला हव्यात. कृषी क्षेत्राशी निगडित व्यवस्थांचे सुसूत्रीकरण आजघडीला महत्त्वाचे आहे.’’
ते म्हणाले, ‘‘विपणनाबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची तसेच कृषी-अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार संधी विकसित करण्याची गरज आहे. नवडिजिटल तंत्रज्ञान डिसरप्टिव्ह (विध्वंसक) आहे. त्यात सेन्सर तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. तथापि, संगणकाप्रमाणे हे तंत्रज्ञान नवरोजगार निर्मितीस चालना देत असेल तर लाभदायी ठरेल. उपलब्ध रोजगार त्यामुळे प्रभावित होत असतील, तर मात्र त्यांचा फेरविचार करावा लागेल.’’ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात म्हणाल्या, ‘‘शाश्वत पर्यावरणीय विकास या बाबीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातून शेती व शेतकऱ्याचे शाश्वत जगणे विकसित व्हायला हवे.’’
‘आयएसएएम’चे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव यांनी कृषी विपणनाच्या क्षेत्रात नवतंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी ‘आयएसएएम’चे सचिव डॉ. टी. सत्यनारायणा, नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. सत्यसाई, जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर रानडे उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले. अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. विद्या कट्टी यांनी आभार मानले.