नांदणीच्या मनोजची फायदेशीर पपई शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदणीच्या मनोजची फायदेशीर पपई शेती
नांदणीच्या मनोजची फायदेशीर पपई शेती

नांदणीच्या मनोजची फायदेशीर पपई शेती

sakal_logo
By

62764
---------------
नांदणीच्या मनोजची फायदेशीर पपई शेती
चार वर्षे घेतोय उत्पादन; साधारण बागेपेक्षा दुप्पट वर्षे बाग
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १६ ः नांदणी (ता. शिरोळ) येथील मनोज (बंडू) चकोते या तरुण शेतकऱ्याने पपईच्या बागेतून फायद्याची शेती केली आहे.
पपईची साधारण बाग दोन-अडीच वर्षे चालते. मात्र तब्बल चार वर्षे पीक घेत असून महापूर, कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी अशी संकटे येऊनही नफ्याची शेती केली आहे. योग्य मशागत व निगा ठेवून चार वर्षे उत्पादन घेत आहे. त्यांनी २६ गुंठे शेतात इंदोर येथून ‘ग्रीनबेरी’ वाणाचे बियाणे मागवून डिसेंबर-२०१८ मध्ये लागवड केली. तत्पूर्वी माती परीक्षण करून शेणखत व गांडूळ खतांचा वापर केला. त्यानंतर उत्पादन सुरू झाले आणि महापुराचा फटका बसला. त्यामुळे फळे गळून गेली. त्यानंतर पुन्हा योग्य ते उपचार करून बाग पुन्हा बहरवली. उत्पादन चांगले मिळू लागले. कोरोना आणि लॉकडाऊन आले. त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली. न खचता, हीच बाग अधिक काळ ठेवून उत्पादन घेतल्यास नुकसान होणार नाही, असा विचार करून बाग अधिक काळ टिकविण्याचा दृष्टिकोन ठेवून मशागत व निगा केली. परतीच्या पावसातही बाग टिकून राहिली. त्यामुळे दोन वर्षे चालणारी बाग आता चार वर्षे होत आली, तरी भरघोस उत्पादन देत आहे. त्यामुळे पपईची शेती फायद्याची ठरली आहे. रासायनिक औषधे आणि खतांचा मारा न करता, जैविक खते व औषधांचा वापर केला. तसेच डंकमाशी, फळमाशी, तुडतुडी, पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाला तरी ‘ट्रॅप’ लावून त्याचे नियंत्रण केले.
साधारण १२ ते १५ फूट उंच वाढणारी झाडे चकोते यांच्या शेतात २० ते २२ फूट उंचीची झाली आहेत. त्यामुळे पपई काढण्याचे आव्हान निर्माण झाले असले तरी ते स्वत: काठीने पपई तोडून हातात झेलून काढणीचे आव्हान संपुष्टात आणले आहे.
----------------
62765
बियाणे अस्सल लागले आणि योग्य निगा ठेवल्याने बाग इतके दिवस चालली. दोन वर्षे चालणारी बाग चार वर्षे झाली तरी उत्पादन देत असल्याने नवीन बाग तयार करण्याचा खर्च वाचला. त्यामुळे अडचणी येऊन व दरात चढ-उतार राहूनही बाग फायद्याची ठरली आहे.
-मनोज चकोते, पपई बागायतदार, नांदणी