मासेवाडी वीज उपकेंद्राचे अडले घोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेवाडी वीज उपकेंद्राचे अडले घोडे
मासेवाडी वीज उपकेंद्राचे अडले घोडे

मासेवाडी वीज उपकेंद्राचे अडले घोडे

sakal_logo
By

मासेवाडी वीज उपकेंद्राचे अडले घोडे
---
आजऱ्यात औद्योगिक विकासाला खीळ; राजकीय इच्छाशक्तीची गरज
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः तालुक्यातील प्रस्तावित मासेवाडी वीज उपकेंद्राचे काम तांत्रिक अडचणीमुळे अडकले आहे. तालुक्यात नवउद्योगांना विजेची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अनेकांनी महावितरण कंपनीकडे मागणी नोंदवली आहे.
विजेच्या मर्यादित उपलब्धतेमुळे नव्याने वीज जोडण्या देण्यास वीज वितरणसमोर अडचणी आहेत. यामुळे तालुक्यातील औद्योगिक विकासाला खीळ बसली आहे. वीज केंद्राचे काम तातडीने मार्गी लागण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तालुक्यात सध्या मलिग्रे, गवसे, उत्तूर व आजरा ही विजेची उपकेंद्रे आहेत. या केंद्रातून तालुक्यात सुमारे ५० एमव्हीए वीज उपलब्ध होते. पण, सध्या तालुक्यात औद्योगिक व कृषी क्षेत्रात विजेची मागणी वाढती आहे. तालुक्याला ६० एमव्हीए विजेची गरज आहे. वीज मागणीचे अनेक जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे मासेवाडी वीज उपकेंद्राचे काम युद्धपातळीवर मार्गी लागणे गरजेचे आहे.
या केंद्राला मासेवाडी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर अन्य आवश्यक सोपस्कार पूर्ण झाले आहेत. २०१९ मध्ये कोरोनापूर्वी या उपकेंद्राची निविदा निघाली होती. कोरोनानंतर कामाचे दर वाढल्याने संबंधित एजन्सीने काम करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे वाढीव दराने फेरनिविदा काढण्याची गरज आहे. काजू प्रक्रिया युनिट, राईस मिल यासह अन्य काजू प्रक्रिया युनिट वाढत आहेत. त्यामुळे विजेची मागणीही वाढत चालली आहे. त्याचबरोबर आंबेओहळ, उचंगी हे पाणी प्रकल्प पूर्ण झाले. सर्फनाला अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषिपंपांना वीजपुरवठ्याची मागणी वाढणार आहे. तालुक्यातील एकूण विजेची गरज लक्षात घेता मासेवाडी वीज उपकेंद्राचे काम मार्गी लागणे गरजेचे आहे. यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पाठपुरावा करण्याची गरज आहे.
------------------
आजरा उपकेंद्रावरील भार होईल कमी
मागणीप्रमाणे वीजपुरवठा करणे शक्य होत नसल्याने आजरा वीज उपकेंद्रावरील विजेचा भार वाढत आहे. या केंद्रावर वीज भार शिल्लक नसल्याने नवीन वीज जोडण्या देणे, पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे अडचणीचे होत आहे. मासेवाडी उपकेंद्र झाल्यास या केंद्रावरील विजेचा भार कमी होण्याबरोबर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही कमी होईल.
--------------
पाणी मुबलक; पण विजेची प्रतीक्षा
सध्या चित्री, आंबेओहळ, उचंगी या मध्यम प्रकल्पांबरोबर अन्य काही लघुप्रकल्प आहेत. यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. पण, कृषिपंपांना वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची विचित्र कोंडी झाली आहे. एकीकडे पाणी मुबलक व प्रत्यक्ष वीज नाही, अशी स्थिती आहे.