रंकाळा कठड्याचे दगड निखळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा कठड्याचे   दगड   निखळले
रंकाळा कठड्याचे दगड निखळले

रंकाळा कठड्याचे दगड निखळले

sakal_logo
By

फोटो 
62844,62845
. . . . . . . . . . . . . .

रंकाळा कठड्याचे दगड निखळले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : रंकाळा तलावाच्या सभोवतालचा संरक्षक कठडा दुरुस्तीचे काम अनेक वर्षे सुरू आहे. तलावाच्या पूर्व बाजूला काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. तांबट कमानीजवळचे अनेक दगड लावून काम पूर्ण झाले होते; परंतु हे दगड दोन भागात तयार केल्याने चार वर्षांत हे चौकोनी दगड विभक्त झाले आहेत आणि जुन्या कठड्याला याचे योग्य जोडकाम न झाल्याने हे दगडही आता पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रस्त्याच्या कंत्राटदारांप्रमाणे रंकाळ्याच्या याही कामाचा दर्जा समोर आला आहे. 

शाहूकालीन तलावाचा दगडी कठडा तसा अद्यापही मजबूत आहे; परंतु वाहनांची धडक आणि झाडांच्या मुळांमुळे अनेक ठिकाणी पडझड होत आहे. रंकाळ्याचे सौंदर्य असलेले कठड्यावरील चौरस आणि मोदक आकाराच्या दगडांनी जागा सोडली होती. त्यांची वेळेवर डागडुजी न झाल्याने एकतर लोकांनी ते पाण्यात ढकलले किंवा रस्त्याकडेला कठड्यावरील दगड वाहनांमुळे पाण्यात पडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही वर्षांपूर्वी दगड तयार करून लावण्याचे कंत्राट देण्यात आले. या कामाकडे पालिका अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले, परिणामी संबंधित कंत्राटदाराने यातील चौकोनी दगड दोन भागांत केले आणि जोडणी केली; पण ही जोडणी इतकी तकलादू आहे, की यातील अनेक दगडांनी कठड्यापासून जागा सोडली आणि चौकोनी दगडही दोन भाग होऊन बाजूला झाले आहेत. हे दगड आता खाली पडून नागरिकांना इजा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे रंकाळाप्रेमी आणि नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रंकाळा पर्यटकांचे आकर्षण कायम राहण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत तलावाच्या संरक्षक कठड्याच्या बांधकामासाठी एक कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झाला. आता यातून पुन्हा हे दोन भागांत केलेले दगड काढून चढ्यादराने नवीन अखंड चौरस दगड आणि त्यावर मोदक दगड बसवण्यात येणार आहेत. म्हणजे दगड बसवण्यासारख्या एकाच ढोबळ कामावर पाच-सहा वर्षांत दोनदा खर्च होणार असल्याने याची जबाबदारी कोणावर आहे, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
.......

‘काही वर्षांपूर्वी कठड्याचे हे दगड बसवण्याचे काम दिले होते; पण चौरस दगड त्यांनी दोन भागात केला आणि जोडकाम नीट न केल्याने हे दगड निखळले आहेत. नवीन कामात याचा समावेश केला आहे. थोड्या अधिक दराने हे चौरस दगड अखंड करून जोडकाम करण्यासाठी काम दिले आहे. आता याकडे लक्ष दिले जाईल.

एन. एस. पाटील, उपशहर अभियंता