तटाकडील तालीम परिसरात डेंगीचा प्रादुर्भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तटाकडील तालीम परिसरात
डेंगीचा प्रादुर्भाव
तटाकडील तालीम परिसरात डेंगीचा प्रादुर्भाव

तटाकडील तालीम परिसरात डेंगीचा प्रादुर्भाव

sakal_logo
By

तटाकडील तालीम परिसरात
डेंगीचा प्रादुर्भाव
---
पंधरा दिवसांत चार रुग्ण; गेल्या महिन्यात एकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : शहरातील मध्यवस्तीत डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांत या परिसरात चार रुग्ण सापडले; तर काही महिन्यांत येथील एका मुलाचा डेंगीमुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, वारंवार तक्रार करूनही महापालिका वेळेवर औषध फवारणी करीत नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
शहरात डेंगी होऊ नये, यासाठी महापालिकेने पावसाळ्यापूर्वी मोहीम राबवली होती. यात त्यांनी घराघरांत जाऊन सर्वेक्षण केले होते. त्यामुळे डेंगीचे रुग्ण आटोक्यात होते. मात्र, गेल्या महिन्यापासून शहरात डेंगीचे रुग्ण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. शहरातील मध्यवस्ती भागात डेंगीचे रुग्ण अधिक असल्याचे नागरिकांनी सांगितले. कपिलतीर्थ मार्केट परिसर, तटाकडील तालीम, ब्रह्मेश्वर पार्क, अर्धा शिवाजी पुतळा या भागात डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी येथे एकाचा डेंगीमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील आणखी एकाला डेंगी झाला. येथील नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे याबाबत तक्रार केली. मात्र, महापालिकेचे कर्मचारी औषध फवारणी वेळच्या वेळी करीत नाहीत. गटारींची सफाईही होत नाही. त्यामुळे डेंगीचे रुग्ण वाढत आहेत, असे नागरिकांनी सांगितले.
------------------
कोट
तटाकडील तालीम परिसरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढला. रुग्णांची संख्याही वाढत आहे. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही औषध फवारणी होत नाही. डासांची पैदास वाढत आहे. गटारीही साफ केल्या जात नाहीत. याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहावे.
- करण शिंदे, नागरिक
----------------
डेंगीचा धोका लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी शहरात सर्वेक्षणाची मोहीम घेतली. तसेच, शहरातील सर्व भागांत औषध फवारणी केली. वारंवार सर्वेक्षण केले आहे. मात्र, जेथे रुग्ण सापडले आहेत, तेथे पुन्हा फवारणी आणि सर्वेक्षण केले जाईल. नागरिकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
- रविकांत अडसूळ, उपायुक्त, महापालिका
----------------
डेंगी टाळण्यासाठी हे करा
- पाणी साठू न देणे
- खराब टायर, एसी, फ्रीजमधील पाणी काढून टाकावे
- वापराचे पाणी गरजेपेक्षा जास्त साठवू नये
- साठविलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी
- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा
- डेंगीची लक्षणे दिसल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावेत