वस्त्रोद्योगातील समस्यांचा धोरणात विचार होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वस्त्रोद्योगातील समस्यांचा
धोरणात विचार होणार
वस्त्रोद्योगातील समस्यांचा धोरणात विचार होणार

वस्त्रोद्योगातील समस्यांचा धोरणात विचार होणार

sakal_logo
By

62892 - प्रकाश आवाडे
62894 - अशोक स्वामी
62893 - सुरेश हाळवणकर


वस्त्रोद्योगातील समस्यांचा
धोरणात विचार होणार
---
राज्याच्या नव्या समितीत आवाडे, स्वामी, हाळवणकर
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ ः नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरविण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केल्याने वस्त्रोद्योगातील विविध घटकांना ऊर्जितावस्था निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. समितीत राज्यातील बहुतांश वस्त्रोद्योग केंद्रातील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील विविध प्रश्नांसह महत्त्वाच्या मागण्यांचा विचार नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरविताना होईल. विशेष म्हणजे दोन महिन्यांच्या आत समितीला शासनाला शिफारशी सादर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे समितीला गतीने काम करावे लागेल.
समितीत इचलकरंजीतून आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचा समावेश आहे. तिघेही वस्त्रोद्योगातील जाणकार आहेत. अनेक वर्षांपासून अडचणीतून जाणाऱ्या वस्त्रोद्योगाला त्यांच्या नियुक्तीमुळे पुढील काळात उभारी मिळण्यास मदत होईल. ही समिती नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार आहे.
राज्याच्या आर्थिक संरचनेत वस्त्रोद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीनंतर या उद्योगात सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ साठी जाहीर केले होते. त्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी विविध उपाययोजना होत्या. या धोरणाची मुदत ३१ मार्च २०२३ ला संपणार आहे. सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. त्यानुसार धोरण ठरविताना वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी ही समिती आज स्थापन करण्यात आली. समिती गरजा व वस्तुस्थितीचा अभ्यास करून विविध शिफारशी करणार आहे.
समिती अशी ः अध्यक्ष- नागपूर वस्त्रोद्योग आयुक्त, सदस्य- पुणे पणन संचालक, नागपूर रेशीम संचालक, मुंबई वस्त्रोद्योग आयुक्त, मुंबई, सोलापूर, नागपूर व औरंगाबाद प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, ‘मेडा’चे प्रतिनिधी, लोकर संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, ‘सासमिरा’चे प्रतिनिधी, सूतगिरणी, यंत्रमाग, हातमाग प्रतिनिधी- प्रकाश आवा़डे, समाधान आवताडे (पंढरपूर), सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, विविध यंत्रमाग व हातमाग केंद्रांतील प्रतिनिधी- मनोज दिवटे (येवला), सलीम शेख (मालेगाव), किशोर उमरेडकर (भनखेडा), श्याम चांदेकर (नागपूर), पेंटाप्पा गड्डम व लक्ष्मीनारायण देवसानी (सोलापूर), शरद मढवी (भिवंडी), गारमेंट प्रतिनिधी- अंकुर गादिया, दिनेश नंदू.

समिती यांचा करणार अभ्यास
१) यापूर्वीच्या दोन वस्त्रोद्योग धोरणांतील फलनिष्पत्ती
२) कापूस उत्पादन व वापर, वस्त्रोद्योगातील नव्या संधी
३) शेजारील राज्यांची धोरणे, वीजदर व केंद्राचे धोरण
४) सहकारी सूतगिरण्यांना तोट्यातून बाहेर काढणे
५) रेशीम शेती व उद्योग प्रक्रिया उभारणी
६) साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण
७) पर्यावरणपूरक प्रोसेसिंग प्रकल्प उभारणी
८) वस्त्रोद्योग विभागाचा शेतकऱ्यांना थेट फायदा