सिनेट निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिनेट निवडणूक
सिनेट निवडणूक

सिनेट निवडणूक

sakal_logo
By

फोटो -

KPC22B10786
....

‘सिनेट’वर विकास आघाडीचे वर्चस्व

३५ तास मतमोजणी; पदवीधर गटात शिव-शाहू आघाडीच्या श्‍वेता परुळेकरने रचला इतिहास

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले. नोंदणीकृत पदवीधर गटात आघाडीचे दहापैकी सात जागांवर उमेदवार विजयी झाले; तर शिव-शाहू आघाडीच्या श्‍वेता परुळेकरने जोरदार मुसंडी मारत बाजी मारली. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) उमेदवार विद्या परिषदेच्या आठपैकी चार जागांवर निवडून आले; तर याआधी दोन जागांवर त्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. महाविद्यालयीन शिक्षक गटाच्या दहापैकी सहा जागांवर ‘सुटा’चे उमेदवार निवडून आले. तत्पूर्वी, त्यांचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दोन जागांवर विकास आघाडीने विजय मिळविला. मतमोजणीसाठी तब्बल ३५ तास लागले. विद्यापीठातील परीक्षा भवन दोनमध्ये मतमोजणी झाली.
अधिसभेच्या ३९, विद्या परिषद आठ व अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन सदस्य याप्रमाणे निवडणूक झाली. अधिसभेवर प्राचार्य गटाच्या दहा, संस्थाचालकांच्या सहा जागांवर विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. पदवीधरच्या दहा जागांपैकी दोन जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. या गटात आठ जागांसाठी निवडणूक होती. विद्या परिषदेच्या आठ जागांपैकी प्रत्येकी दोन जागांवर ‘सुटा’ व विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या गटात चार जागांसाठी निवडणूक झाली. महाविद्यालयीन शिक्षक गटातील दहापैकी दहा जागांसाठी निवडणूक होऊन दोन जागांवर विकास आघाडीने बाजी मारली; तर शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेने (सुप्टा) विद्यापीठ अधिविभाग शिक्षक गटातील तिन्ही जागा जिंकल्या. नोंदणीकृत पदवीधरांच्या मतमोजणीस आज पहाटे सुरुवात झाली. यात कोण बाजी मारणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. या गटाची सायंकाळी सातपर्यंत मतमोजणी सुरू होती.
------------
विजयी उमेदवार असे ः
* नोंदणीकृत पदवीधर- शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी- अभिषेक मिठारी (इतर मागासवर्ग), रतन कांबळे (अनुसूचित जाती), अमरसिंह रजपूत (भटक्या विमुक्त जाती), अजित रघुनाथ पाटील (खुला), विष्णू खाडे (खुला), अमित जाधव (खुला), स्वागत गोपालकृष्ण परुळेकर (खुला), बिनविरोध- लोभाजी तातेराव भिसे (अनुसूचित जमाती), उषा प्रदीप पवार (महिला).
- शिव-शाहू आघाडी- श्‍वेता परुळेकर (खुला).
.....

* महाविद्यालयीन शिक्षक- ‘सुटा’- डॉ. बबन सातपुते (अनुसूचित जाती) डॉ. ज्ञानदेव काळे (भटक्या विमुक्त जाती), डॉ. प्रकाश कुंभार (इतर मागासवर्ग), डॉ. डी. एन. पाटील (खुला), डॉ. मनोज गुजर (खुला), डॉ. निवास वरेकर (खुला), बिनविरोध- शाहीन अब्दुलअजी पटेल (महिला राखीव), शिवाजी केरबा बोथीकर (अनुसूचित जमाती).
- विकास आघाडी- डॉ. रघुनाथ ढमकले (खुला), डॉ. प्रशांत खरात (खुला).
.....

* विद्या परिषद- ‘सुटा’ : डॉ. सुनील बनसोडे (अनुसूचित जाती, मानव्यशास्त्र), डॉ. पोपट पाटील (खुला प्रवर्ग, मानव्यशास्त्र), डॉ. राजेश निमट (खुला, विज्ञान), डॉ. सुनील चव्हाण (खुला, आयडीएस).
- विकास आघाडी बिनविरोध उमेदवार : डॉ. वर्षा मैंदर्गी (वाणिज्य व व्यवस्थापन), डॉ. जगदीश सपकाळे (विज्ञान व तंत्रज्ञान),
----------------
चौकट
‘सुटा’चे मताधिक्य वाढले...
गेल्या निवडणुकीत ‘सुटा’च्या उमेदवारांना एकूण ५१ टक्के मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते लक्षात घेता त्यांना यंदा ५८ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा सात टक्के मताधिक्य वाढले. विद्या परिषदेच्या निवडणुकीतही ‘सुटा’च्या उमेदवारांचे मताधिक्य वाढले आहे. गत निवडणुकीत विरोधी उमेदवारांना सरासरी एक हजार २११ मते मिळाली होती. या वेळी विरोधी उमेदवारांना प्रत्येकी सरासरी एक हजार १८ मते मिळाली, असे ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी सांगितले.
----------------
चौकट
श्वेता परुळेकरचा नियोजनबद्ध प्रचार
पदवीधर गटातील निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून निवडून येणारी श्‍वेता परुळेकर पहिली महिला प्रतिनिधी ठरली. तिने नियोजनबद्ध केलेल्या प्रचाराने विकास आघाडीलाही धक्का बसला. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठ विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. पंकज मेहता नोंदणीकृत पदवीधर गटातून पराभूत झाले. त्यांचा पराभव चर्चेचा विषय ठरला.
----------------
चौकट
डॉ. ढमकले पराभवाचा वचपा काढला
न्यू कॉलेजमधील इंग्रजी विषयाचे डॉ. रघुनाथ ढमकले ‘सुटा’चे सदस्य होते. गत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यंदा ते विकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून खुल्या गटातून विजयी झाले. गत निवडणुकीतील पराभवाचा त्यांनी वचपा काढला.
.................
चौकट
युवा सेना प्रथमच निवडणूक रिंगणात
शिव-शाहू आघाडीच्या माध्यमातून युवा सेना प्रथमच निवडणूक रिंगणात उतरली होती. पदवीधर गटात अक्षय दांगट उमेदवार होते. ते पराभूत झाले. केवळ आठ दिवसांत त्यांचा कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता.
--------------
चौकट
डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून अभिनंदन
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रमुख तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठात येऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांच्याबरोबर प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. डी. आर. मोरे, अमित कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब उलपे होते. कुलसचिव संजय पाटील, प्रा. प्रताप पाटील, प्रा. मधुकर पाटील यांनी काल (ता. १६)पासून विद्यापीठातच ठिय्या मारला होता.