उसासह हरभरा क्षेत्र वाढीचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसासह हरभरा क्षेत्र वाढीचे संकेत
उसासह हरभरा क्षेत्र वाढीचे संकेत

उसासह हरभरा क्षेत्र वाढीचे संकेत

sakal_logo
By

63029
----------
उसासह हरभरा क्षेत्र वाढीचे संकेत
गडहिंग्लज तालुका : रब्बी ज्वारी सरासरी गाठणार, गहू-मका घटणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : तालुक्यामध्ये या वर्षीच्या रब्बी हंगामातील पेरण्या आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये रब्बी ज्वारी सरासरी गाठेल तर गहू व मक्याचे क्षेत्र घटणार आहे. ऊस आणि हरभरा क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.
या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत अवकाळी पाऊस होता. यामुळे जमिनीतील ओल ओसरण्यास अवधी लागला. तसेच सोयाबीनची काढणीही उशिराने झाली. परिणामी रब्बी हंगामाच्या पेरण्या काहीशा पुढे गेल्या. अजून एक आठवडा पेरणी होतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. १५ नोव्हेंबर अखेर कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार ज्वारीची पेरणी सरासरी इतकी होईल. गहूची पेरणी आतापर्यंत केवळ २० हेक्टरवर तर मक्याची लागवड अवघ्या १५० हेक्टरवर झाली आहे. यंदा हे दोन्ही पीक सरासरी गाठतील की नाही, याबाबत संभ्रम आहे. बहुतांश प्रमाणात त्याचे क्षेत्र घटण्याचा अंदाज आहे.
हरभऱ्‍याची लागवड तालुक्यात सरासरी ६०० हेक्टरमध्ये होते. या वर्षी आतापर्यंत या पिकाच्या लागवडीने सरासरी ओलांडली असून आणखीन आठ दिवसांत काही अंशी क्षेत्रात हरभरा पेरणीचे संकेत आहेत. यामुळे या पिकाची लागवड ७०० हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आंबेओहोळ प्रकल्पातील पाणी बारमाही उपलब्ध झाल्याने तालुक्यातील लाभक्षेत्रात उसाची लागवड वाढण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. गतवर्षी ११ हजार ५९९ हेक्टरमध्ये ऊस होता. यंदा १२ ते १३ हजार हेक्टरपर्यंत ऊसाचे क्षेत्र होईल, असा अंदाज आहे. या वर्षी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९१२ हेक्टरमधील उसाचे खोडवा पीक शेतकऱ्‍यांनी कायम ठेवले आहे. पूर्व हंगामातील उसाची लागवड २७० हेक्टरमध्ये झाली असून तालुक्यात १५ डिसेंबरनंतरच उसाची नवीन (सुरू) लागवड वाढते. तालुक्यात जून-जुलैमधील आडसाली ऊस लागवड नगण्य असते.
--------------------
* तालुक्यातील रब्बी दृष्‍टिक्षेपात (आकडे हेक्टरमध्ये)
------------------------------------------
*पिकाचे नाव *सरासरी उद्दिष्ट *१५ नोव्हेंबरपर्यंतची पेरणी
------------------------------------------
*ज्वारी *३०७६ *२६५०
*गहू *९५ *२५
*मका *५०० *१६०
*हरभरा *६०० *६२५
*इतर कडधान्ये *२५ *५०