विमानतळ विस्तारीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ विस्तारीकरण
विमानतळ विस्तारीकरण

विमानतळ विस्तारीकरण

sakal_logo
By

62998

विमानतळासाठी जमीन संपादनाला वेग
---
नागरिकांचाही प्रतिसाद; आज तीन हेक्टरची खरेदी, २८ कोटींचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्‍यक जमीन संपादनाला पुन्हा वेग आला आहे. विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जमीन मालकांचाच यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असून, आज एकाच दिवशी तब्बल तीन हेक्टर जमिनीची खरेदी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने केली. या खरेदीपोटी नऊ जमीन मालकांना तब्बल २८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते जमीन मालकांना त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यानुसार धनादेश देण्यात आले. मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील उपनिबंधक (मुद्रांक) कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
विमानतळ विकासासाठी आवश्‍यक जमीन संपादनासाठी सुमारे २०६ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच प्राप्त झाला. यासाठी गडमुडशिंगी व तामगाव (ता. करवीर) या दोन गावांतील २६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी गडमुडशिंगी येथील ३४ गुंठ्यांपैकी २८ गुंठे जमीन यापूर्वीच खरेदी करण्यात आली. उर्वरित जमीन मालकांनी आपली जमीन देण्यास नकार दिल्याने ही जमीन सक्तीने संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आज गडमुडशिंगी येथील एकूण संपादित जमिनीपैकी तीन हेक्टर जमिनीची खरेदी करण्यात आली. यात नऊ खातेदार होते, त्यांना खरेदीपत्रावर सह्या झाल्यावर उपनिबंधक कार्यालयातच त्यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीच्या पैशांचे धनादेश वितरित करण्यात आले. ही जमीन रेडीरेकनरच्या चार पट दराने खरेदी करण्यात आली. लोकच आपली जमीन घ्या, म्हणून पुढे येत असल्याने या जमीन खरेदीला वेग आला आहे. आजही लोकांना जमिनीची खरेदी झाल्यावर लगेच धनादेश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रियाही वेगाने राबविण्यात येणार आहे.
.................

संपादित जमिनीला चांगला दर दिला जात असल्याने लोकांचाही प्रतिसाद आहे. त्यामुळे उर्वरित जमीन संपादन करण्यासाठी संबंधित जमीन मालकांनी आपसांतील वाद मिटवून जमीन संपादनासाठी सहकार्य करावे.
- दीपक नलवडे, अप्पर जिल्हाधिकारी,
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी