ग्रामिण ते ग्लोबल विद्यापीठाची यशस्वी वाटचाल ः कुलगुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामिण ते ग्लोबल विद्यापीठाची यशस्वी वाटचाल ः कुलगुरू
ग्रामिण ते ग्लोबल विद्यापीठाची यशस्वी वाटचाल ः कुलगुरू

ग्रामिण ते ग्लोबल विद्यापीठाची यशस्वी वाटचाल ः कुलगुरू

sakal_logo
By

60029 -
डॉ. डी. टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठाची वाटचाल ‘लोकल टू ग्लोबल’
---
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के; राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी

लीड
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेला आज (शुक्रवार, ता. १८) ६० वर्षे पूर्ण होत असून, विद्यापीठ ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या प्रवासात विद्यापीठाने प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानंतर विद्यापीठ आणि उच्चशिक्षणात कोणते बदल होतील, याबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी ‘सकाळ’तर्फे साधलेला संवाद.
- ओंकार धर्माधिकारी

प्रश्न ः विद्यापीठाच्या सहा दशकांच्या वाटचालीकडे कसे पाहता?
डॉ. शिर्के ः शिवाजी विद्यापीठाची वाटचाल ‘लोकल टू ग्लोबल’ आहे. विद्यापीठाच्या सर्व घटकांनी नेहमीच नावीन्याचा ध्यास घेऊन काळाप्रमाणे स्वतःत बदल केले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा दिल्या. गेल्या सहा दशकांत विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उंचावलेली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी विद्यापीठाची स्थापना झाली. यात छत्रपती राजाराम महाराज, डॉ. बाळकृष्ण, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मोठे योगदान आहे. सुरुवातीला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणात प्रमाण वाढविणे, हाच मुख्य उद्देश होता. त्यानंतर संशोधनावर भर देण्यात आला. आज विद्यापीठातील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. विद्यापीठाचे विद्यार्थी अमेरिका, दक्षिण कोरियासह जगभरातील नामांकित संस्थांमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठाला संशोधनासाठी डीआरडीओ, रुसा, युनिसेफ, सीएसआर आदी सर्वांचाच निधी मिळाला. विद्यापीठात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत सर्व कुलगुरूंचे मोठे योगदान आहे. महाविद्यालयांनीही विद्यापीठाची कामगिरी उंचावण्यास नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.

प्रश्न ः नव्या शैक्षणिक धोरणामुळे उच्चशिक्षणात कोणते बदल होतील? त्याचा विद्यार्थ्यांना कोणता लाभ होईल?
डॉ. शिर्के ः देशात कुशल मनुष्यबळ, सुजाण नागरिक तयार व्हावेत, ही गरज लक्षात घेऊन नवे शैक्षणिक धोरण बनविण्यात आले. छोट्या-छोट्या महाविद्यालयांची क्लस्टर विद्यापीठे बनवली जाणार आहेत. महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात येईल. त्यामुळे संस्था, विद्यापीठे नवे व्यावसायिक अभ्यासक्रम स्थानिक गरजेनुसार बनवू शकणार आहेत. परीक्षा, मूल्यांकन, अभ्यासक्रम निर्मिती यांचे स्वातंत्र्य महाविद्यालयांना मिळेल. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने स्वावलंबी होतील. विद्यापीठाची उच्चशिक्षणातील भूमिकाही या धोरणाने बदलणार आहे. विद्यापीठांमध्ये अधिक प्रमाणात संशोधनाचे काम केले जाईल. नव्या धोरणामुळे उच्चशिक्षणात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल होतील. शिवाजी विद्यापीठाने नव्या धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, ऑनलाईन शिक्षण या सर्वांमध्ये विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. शिवाजी विद्यापीठ ऑनलाईन एम.बी.ए. अभ्यासक्रम सुरू केला असून, त्याचा लाभ अनेकांना होत आहे.

प्रश्न ः नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिवाजी विद्यापीठाचे स्वरूप कसे असेल?
डॉ. शिर्के ः शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी बहुतांश महाविद्यालये पुढील काही वर्षांत स्वायत्त होतील. त्यानंतर विद्यापीठाचे कामकाज कॅम्पसपुरते असेल. याचा लाभ इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. विद्यापीठात आपण बी.एस्सी. आणि एम.एस्सी. इकॉनॉमिक्स अभ्यासक्रम सुरू केला. नॅनो सायन्स विभागातही पदवी अभ्यासक्रम सुरू झाला. आता विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणाचा अनुभव हे विद्यार्थी बारावीनंतर घेतील. त्यांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावण्यासाठी याचा लाभ होईल. विद्यापीठातील अधिविभागही स्वयत्त होतील. मूलभूत संशोधनासाठी विद्यापीठात अधिक संधी उपलब्ध होतील. यामुळे विद्यापीठ शैक्षणिक संकुल बनणार असून, येथील संधीचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेता येईल. पीएच.डी. करणाऱ्या संशोधकांची विद्यापीठातील संख्याही वाढणार आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठ संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीतून चालणारे उपक्रम यात आणखी नावलौकिक मिळवेल.