कोल्हापुर जिल्ह्यात ऊस आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुर जिल्ह्यात ऊस आंदोलन
कोल्हापुर जिल्ह्यात ऊस आंदोलन

कोल्हापुर जिल्ह्यात ऊस आंदोलन

sakal_logo
By

उसावरील कोयता थांबला!
आजही आंदोलन; स्वाभिमानाचा वाहने पेटविण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनास कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून दोन दिवस आंदोलन सुरू राहणार आहे. दिवसभर जिल्ह्यात आंदोलकांनी शिवारातील ऊस तोड रोखली. साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक आडवली. आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडली. आंदोलनामुळे साखर कारखाना परिसरात शुकशुकाट होता. उत्स्फूर्त आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उद्या (ता. १८) शुक्रवारी वाहतूक सुरू केल्यास वाहने पेटविण्याचा इशारा संघटनेने दिला.
गेल्या वर्षी तुटून गेलेल्या उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये व या वर्षी एकरकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही, यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व साखर कारखाने, वाहतूकदार व शेतकऱ्यांनी गुरुवारी व शुक्रवारी ऊसतोड बंद करावी, असे शेट्टी यांनी आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विविध गावात फिरून त्यांनी कारखान्यांकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर, बैलगाड्या, ट्रक रोखले. शेट्टी यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने दिवसभर बंद होते. आंदोलनाच्या धास्तीने काही ठिकाणी ऊस वाहतूकही बंदच होती. त्यामुळे ऊसतोड मजुरांना विश्रांती मिळाली. काही गावांतील शिवारातील ऊस तोड रोखताना आंदोलक व शेतमजूर यांच्यात वादावादीचे प्रकार घडले. मजुरांकडून कोयते व खुरपे काढून घेण्यात आले. श्री. शेट्टी, संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी कार्यकर्त्यासोबत फिरून आंदोलन केले. काही साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शिल्लक ऊस असल्यान तेथे सकाळी काही वेळ कारखान्यांचे गाळप सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले.
(आणखी वृत्त, छायाचित्रे पान २ वर)

सांगली, साताऱ्यात प्रतिसाद
दरम्यान, आंदोलनाला सांगली, सातारा, नाशिक भागात प्रतिसाद मिळाला. सांगलीत पलूस, खानापूर तालुक्यात कार्यकर्त्यांनी तोडी रोखल्या. सोलापूर, पुणे, नगर भागात संमित्र प्रतिसाद मिळाला. पंढरपूर, माढा भागात कारखान्यांनी स्वतःहून तोडी बंद ठेवल्या होत्या. विदर्भ, मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी तोडी बंद होत्या.