मुलींमध्ये होरायझन, मुगळी विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलींमध्ये होरायझन, मुगळी विजेते
मुलींमध्ये होरायझन, मुगळी विजेते

मुलींमध्ये होरायझन, मुगळी विजेते

sakal_logo
By

63087
---------------------------------
मुलींमध्ये होरायझन, मुगळी विजेते
तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : मुलांमध्ये साधना, सर्वोदय, संभाजीराव माने प्रथम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : तालुकास्तरीय शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात झाल्या. १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटात एकूण ३४ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींच्या गटात येथील न्यू होरायझन स्कूल व मुगळीच्या न्यू इंग्लिश स्कूलने अनुक्रमे १४ व १७ वयोगटाचे विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात साधना हायस्कूल, सर्वोदय स्कूलने टायब्रेकरवर प्रतिस्पर्ध्यांना मात देत बाजी मारली. चुरशीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय १९ वर्षांखालील गटाचे विजेते बनले. येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली.
चौदा वर्षांखालील मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात साधना हायस्कूलने न्यू होरायझनचा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रिएटिव्ह स्कूलने छत्रपती शिवाजी विद्यालयाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात साधना हायस्कूलने न्यू होरायझनचा ५-३ असा टायब्रेकरवर पराभव करीत विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या गटात न्यू होरायझनने शिवराज इंग्लिश स्कूलचा २-० गोलने एकतर्फी पाडाव करीत विजेतेपद पटकाविले.
सतरा वर्षांखालील मुलांच्या उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूलने साई इंटरनॅशनल स्कूलला तर गडहिंग्लज हायस्कूलने एम. आर. हायस्कूलला पराभूत करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सर्वोदयने टायब्रेकरवर गडहिंग्लज हायस्कूलचा ५-४ असा पराभव केला. तर मुलींच्या गटात उपांत्य सामन्यात मुगळीने शिवराज स्कूलवर १-० असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात साधनाने न्यू होरायझनला टायब्रेकरवर २-० ने नमवित अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मुगळी संघाने साधना हायस्कूलचा टायब्रेकरवर ३-२ असा फडशा पाडत अजिंक्यपद पटकाविले.
एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटात संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय व एम. आर. कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातील अंतिम सामना चुरशीचा झाला. युवराज संकपाळच्या निर्णायक गोलच्या जोरावर संभाजीराव मानेने बाजी मारली. सचिन बारामती, ओमकार सुतार, चिमा बांदार, ओमकार पाटील, राहुल पवार, किरण कावणेकर, किरण मेत्री, गणपती हुलसार यांनी पंच म्हणून काम पाहिले. दरम्यान, सर्व विजेत्या संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे.
तत्पूर्वी, साधना शिक्षण संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. गडहिंग्लज तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष विनायक नाईक यांनी स्वागत केले. प्राचार्य संजय कुंभार, प्रा. सुरेश धुरे, शिवाजी कुराडे, राजाराम माने, प्रा. जयवंत पाटील, विनायक शिंदे, अनिल चौगुले, देवदत्त कांबळे, प्रा. डी. व्ही. पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते. संपत सावंत यांनी आभार मानले.