कोल्हापूर शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्या
कोल्हापूर शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्या

कोल्हापूर शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्या

sakal_logo
By

लोगो - सांस्कृतिक कोल्हापूर


६३०९६
‘हमीदाबाईची कोठी’ने उघडणार पडदा
राज्य नाट्य स्पर्धा; सोमवारपासून आयोजन, पंधरा डिसेंबरपर्यंत पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येथील केंद्रावर सोमवार (ता. २१) पासून राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सुगुण नाट्य संस्थेच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार आहे. पंधरा डिसेंबरपर्यंत रोज सायंकाळी सातला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात एकूण १९ नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. यंदाही एकाहून एक सरस प्रयोग स्पर्धेत सादर होणार असून प्रत्येक दिवशी सकाळी नाट्यगृहावर प्रवेशिकांचे वितरण होणार आहे. दहा आणि पंधरा रुपये असे प्रवेशिका शुल्क यंदाही असेल.
चंद्रकांत कल्लोळी लिखित ‘फुटबॉल’, विद्यासागर अध्यापक लिखित ‘बॅलन्स शीट’, ‘नाव झालं पाहिजे’, डॉ. प्रमोद कसबे लिखित ‘घोस्ट ऑन कंत्राट’, कादंबरी माळी, अनिरुद्ध दांडेकर लिखित ‘मोठ्ठा पाऊस झाला आणि...’, दिलीप जगताप लिखित ‘तीर्थक्षेत्र’, रविदर्शन कुलकर्णी लिखित ‘द केअर टेकर’, प्रा. हितेश दायमा, हर्षवर्धन कारंडे-देशमुख लिखित ‘फॉर रेंट'', सुरेश जयराम लिखित ‘डबल गेम’, मधुकर तोरडमल लिखित ‘मगरमिठी’, विद्यासागर अध्यापक लिखित ‘ब्रेकिंग न्यूज’, वीरेंद्र गणवीर लिखित ‘गटार’, राहुल सडोलीकर लिखित ‘जंगल जंगल बटा चला है’, सचिन निकम लिखित ‘क्रॉस द लाईन’, युवराज पाटील लिखित ‘एस आय ब्लीड'', ज्ञानेश मुळे लिखित ‘जत्राट एंटरटेनमेंट लि.’, चैतन्य सरदेशपांडे लिखित ‘एक्स्पायरी डेट’, चं. प्र. देशपांडे लिखित ‘गोळ्या काढलेले पिस्तूल’ या नाटकांची पर्वणी यंदा रसिकांना मिळणार आहे.
-----------------
स्वरमाधव फाउंडेशनतर्फे
२६ नोव्हेंबरपासून नाट्यवर्ग
कोल्हापूर, ता. १८ : स्वरमाधव फाउंडेशनतर्फे २६ व २७ नोव्हेंबरला नाट्यवर्ग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत सलग दोन दिवस ही कार्यशाळा होणार असून २४ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी आवश्यक आहे.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ‘भरताची नाट्यदृष्टी’ या विषयावर रूईया कॉलेज, मुंबईच्या डॉ. मंजुषा गोखले, ‘संस्कृत रंगभूमी : काल आणि अवकाश’ या विषयावर अभिनेत्री डॉ. समीरा गुजर-जोशी, तर ‘संस्कृत नाटकाचे आधुनिक सादरीकरण’ या विषयावर लेखक तन्मय भोळे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी ‘नेपथ्य व प्रकाशयोजना’ व ‘संगीत’ या विषयावर लेखक व दिग्दर्शक प्रदीप वैद्य आणि ‘वेशभूषा व रंगभूषा’ या विषयावर प्रसिद्ध वेशभूषाकार गीता गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत. नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/Ph१DYDSa१५LRDpBv६ ही लिंक असून अधिक माहितीसाठी फाउंडेशनच्या मेघा कढे-नाटेकर यांच्याशी संपर्क साधावा.
-----------------
63090
वारसा दिनानिमित्त
संजय शेलार यांचे प्रदर्शन
कोल्हापूर, ता. १८ ः जागतिक वारसा दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे येथील प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन होणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक वस्तूसंग्रहालयात उद्या (ता. १९) पासून हे प्रदर्शन होणार असून २५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. पहिले दोन दिवस सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल. श्री. शेलार यांच्या अनेक कलाकृतींना जगभरातील विविध पुरस्कार मिळाले असून अशाच अनेक कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश आहे.
...............
63091

चित्रकला स्पर्धेला
विद्यार्थिनींचा प्रतिसाद
कोल्हापूर, ता. १८ ः बालदिनाच्या निमित्ताने येथील मुलींच्या शाळांत झालेल्या चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्सतर्फे ही स्पर्धा झाली. उषाराजे हायस्कूल आणि प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमधील मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध गटात ७८ मुलींना पारितोषिके देण्यात आली. वयोगटातील एकूण ७८ जणी विजयी ठरल्या, ज्यामध्ये सर्वोच्च ३ विजेत्या आणि सहभागाची बक्षिसे मिळविणारे सहभागी होते. मनातील विचार कला आणि चित्रकलेच्या सर्जनशील माध्यमातून व्यक्त व्हावेत आणि त्या माध्यमातून आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ही स्पर्धा घेतल्याचे यावेळी कार्थिक रामन यांनी सांगितले.
---------------
63094
डॉ. आंबेडकर शाळा
प्रवेश दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कोल्हापूर, ता. १८ ः जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार नुकताच विद्यार्थी सप्ताह साजरा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून झालेल्या या सप्ताहांतर्गत झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रायव्हेट हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण झाले. शहरातील तेरा शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांवर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाषणे केली. स्पर्धेत अनुक्रमे अदिती जाधव (गर्ल्स हायस्कूल), शेफाली देसाई (तवनाप्पा पाटणे हायस्कूल), प्रतीक्षा गावडे (सुसंस्कार हायस्कूल), अश्विनी सुतार (नवभारत हायस्कूल), शफिया सय्यद (प्रायव्हेट हायस्कूल) यांनी पारितोषिके पटकावली. माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रायव्हेट मुख्याध्यापक सतीश भोसले, उपमुख्याध्यापक गिरीश जांभळीकर, पर्यवेक्षक प्रसन्न जोशी, परीक्षक सुनील गोंधळी, व्ही. के. सणगर आदी उपस्थित होते.
--------------
देवल क्लबमध्ये
उद्या सुगम संगीत स्पर्धा
कोल्हापूर, ता. १८ ः येथील देवल क्लबमध्ये दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २०) संस्थेच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही महाविद्यालयाला जास्तीत जास्त पाच स्पर्धक पाठवता येतील. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटांचा कालावधी दिला जाणार असून, त्या वेळेत त्याने चित्रपट व नाट्यगीताव्यतिरिक्त कोणतेही मराठी किंवा हिंदी गीत, गझल, भजन, अभंग, भावगीत सादर करायचे आहे. या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड होणार आहे.