विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीही जोपासली, मंत्री चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीही जोपासली, मंत्री चंद्रकांत पाटील
विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीही जोपासली, मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीही जोपासली, मंत्री चंद्रकांत पाटील

sakal_logo
By

63195
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ गीताचे लोकार्पण झाले. या वेळी डावीकडून प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीही जोपासली
मंत्री चंद्रकांत पाटील; शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सवी वर्धापन दिन दिमाखात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : शिवाजी विद्यापीठाने गेल्या साठ वर्षांत शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर प्रगती केलीच; पण त्याचबरोबरीने सामाजिक बांधिलकीही प्राधान्याने जोपासली, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रम समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत, तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करण्याच्या दिशेने आता शिवाजी विद्यापीठाने काम करावे. अलीकडेच शासनाने ‘युनिसेफ’ समवेत एक महत्त्वाचा करार केला. याअंतर्गत जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा विकास करण्यासाठी बहुस्तरित प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून या सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे.’’
कार्यक्रमाला विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. मंत्री श्री. पाटील यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव निधीपैकी पाच कोटी ३५ लाखांचा निधी कालच शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील, सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

--------------
चौकट
मत्स्यालयासाठी लागणारा सर्व निधी देऊ
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने बोलताना मंत्री पाटील यांनी, शिवाजी विद्यापीठाने यासाठीचा सर्वंकष प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यासाठी लागणाऱ्या सर्व निधीची तरतूद ही राज्य शासनातर्फे करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. त्याचप्रमाणे कौशल्य विकास, विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे, त्यांना सुरक्षा व प्रतिकाराचे प्रशिक्षण यांसह काही अभिनव उपक्रम असतील, तर त्यासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांना केले.
-------------
जानेवारीत सामंजस्य करार
डॉ. सावंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात कृषी व अकृषी विद्यापीठांतील सुसंवाद वाढवण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने वर्धापन दिन समारंभास प्रथमच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आमंत्रित करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. मूलभूत संशोधनाचे उपयोजित संशोधनात व तंत्रज्ञानात रूपांतर करून त्याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा झाली. येत्या जानेवारीमध्ये या संदर्भातील सामंजस्य करार करण्यासाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांना डॉ. सावंत यांनी आमंत्रित केले.
--------------
कोट
विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविण्यामध्ये शिवाजी विद्यापीठ सदैव आघाडीवर असून नवनवीन शैक्षणिक व संशोधकीय उपक्रमांचे लाभ विद्यार्थ्यांना करवून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, संशोधनवृत्ती, पोस्ट-डॉक शिष्यवृत्ती आदी प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. मातृभाषेतून शिक्षणाचा भाग म्हणून कायदा विषयाच्या परीक्षा इंग्रजीसह मराठीतून घेण्यास सुरवात केली आहे.
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू