महापालिकेला कारणे दाखवा नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला कारणे दाखवा नोटीस
महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

sakal_logo
By

63250
कोल्हापूर : जयंती नाला, दुधाळी नाल्यातील सांडपाण्याबाबत कॉमन मॅनचे ॲड. बाबा इंदुलकर, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, उदय गायकवाड आदींनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जयंती, दुधाळी नालाप्रश्‍नी पालिकेला नोटीस
प्रदूषण नियंत्रणकडून कारवाई; ‘प्रजासत्ताक’, कॉमन मॅन संघटनेतर्फे निवेदन
कोल्हापूर, ता. १८ : गेल्या महिन्यापासून ओसंडून वाहत असलेला जयंती नाला तसेच दुधाळी नाल्यातून सोडल्या जात असलेल्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्‍नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. सात दिवसांत योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई व कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदुलकर यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी तातडीने महापालिकेचे जल अभियंता तसेच पर्यावरण अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राबाडे मळा येथे दुधाळी नाल्यातून थेट पंचगंगा नदीत सांडपाणी जात आहे. मोरेवाडी, पाचगांव, कळंबा येथील सांडपाणी जयंती नाल्यात जात असून तिथे उपसा क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने ओसंडून वाहून पंचगंगा नदीत मिसळत आहे. या दोन्ही कारणांमुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण होत आहे. याबाबत आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ तोंडी व लेखी निदर्शनास आणून देऊनही हेतुपुरस्सर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. विविध कारणे सांगून पाणी प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या तरतुदींना हरताळ फासला जात आहे. एकीकडे सांडपाणी अधिभार गोळा केला जातो आणि सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत सोडून सर्वसामान्य जनतेच्या जिवास धोका निर्माण करण्याच्या कामास सहकार्य करत आहात. सहनशीलतेचा अंत झाला असून कठोर व ठोस कारवाई केली पाहिजे. या वेळी उदय गायकवाड, अविनाश दिंडे, जाफर मुजावर उपस्थित होते.