...अन्यथा रस्त्याचे काम करू देणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...अन्यथा रस्त्याचे काम करू देणार नाही
...अन्यथा रस्त्याचे काम करू देणार नाही

...अन्यथा रस्त्याचे काम करू देणार नाही

sakal_logo
By

ajr183.jpg
63248
आजरा ः येथील तहसीलदार कार्यालयात बैठकीत प्रश्न मांडताना नागरिक. यावेळी वसुंधरा बारवे, टी. एस. शिरगुप्पे.
-------------------------------------
...अन्यथा रस्त्याचे काम करू देणार नाही
आजऱ्यात शेतकरी आक्रमक; विश्वासात घेण्याची मागणी; प्रांताधिकाऱ्यांचे सहकार्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १८ ः केवळ वळणे व विस्तारीकरण याचा विचार न करता जेवढी शेतजमीन रस्त्यात जाते त्याची नुकसानभरपाई शासनाने द्यावी. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. अन्यथा रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. रस्ता हा सर्वांसाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भुदरगड आजराच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले. आजरा शहरातील रहिवाशांनी मोर्चाने येऊन प्रांताधिकारी श्रीमती बारवे यांना निवेदन दिले.
येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी, आजरा शहरवासीय व अधिकारी यांची बैठक झाली. प्रांताधिकारी श्रीमती बारवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे प्रमुख उपस्थित होते. पॉवर पॉईंटने रस्त्याबाबत सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले. चर्चेत शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रस्त्याचे काम गाफील ठेवून केले जात असल्याचा आरोप केला.
संपत देसाई म्हणाले, ‘सध्याचा रस्ताचा काही भाग हा शेतकऱ्यांच्या नावावर असून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याचबरोबर रस्त्याचे विस्तारीकरण व मुजबुतीकरणासाठी पुन्हा आवश्यक जमीन संपादित केली, तर त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हा रस्ता व्यावसाईक आहे. याला टोल लावून व्यवसाय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या दराने नुकसानभरपाई मिळावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात जाणार आहे. शेतकऱ्यांना स्पष्टता येण्यासाठी गावचावडीवर माहितीचा जाहीरनामा लावावा.’
शिवाजी गुरव, संजय तर्डेकर, सुधीर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. विलास नाईक यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी केली. शिवाजी इंगळे, अनंत मोरजकर, अरुण देसाई, गणपती येसणे, जयवंत थोरवतकर, नाथ देसाई, बशीर दरवाजकर, गोविंद पाटील, प्रकाश मोरजकर, हंबीरराव अडकूरकर यांनी सूचना मांडल्या. जयवंतराव शिंपी, मानसिंगराव देसाई, दिनेश कुरुणकर आदी उपस्थित होते.
-------------
* बायपास झालाच पाहिजे
आजरा शहरातील गर्दी टाळण्यासाठी व अवजड वाहनांसाठी बायपास (वळण रस्ता) झालाच पाहिजेत. यामुळे अपघात टळतील. वळण रस्ता झाल्याशिवाय आजरा शहरातून रस्ता करू देणार नाही, अशी भूमिका शहरवासीयांनी घेतली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी श्रीमती बारवे यांना दिले.
--------------------
* झाडांची नुकसानभरपाई मिळावी
रस्त्याचे दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करावे. त्यांच्या हद्दीत येणाऱ्या झाडांची नोंद करून त्याची नुकसानभरपाई मिळावी. काही झाडे तोडून पळवली आहेत. हे चुकीचे आहे. याबाबतही नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.