मेन राजारामचे स्‍थलांतर नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामचे स्‍थलांतर नाहीच
मेन राजारामचे स्‍थलांतर नाहीच

मेन राजारामचे स्‍थलांतर नाहीच

sakal_logo
By

(सकाळ बातमीचा परिणाम)
(२ नोव्‍हेंबरच्या अंकातील मेन राजारामच्या स्‍थलांतराचा घाट या बातमीचे कात्रण वापरावे)

‘मेन राजाराम’चे
स्‍थलांतर नाहीच
मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीची कोरे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १९ : गेल्या पंधरा दिवसांपासून गाजत असलेल्या मेन राजाराम स्‍थलांतराच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. ऐतिहासिक महत्त्‍व असलेल्या मेन राजाराम हायस्‍कूलचे अजिबात स्‍थलांतर केले जाणार नाही, अशी ग्‍वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले. श्री. कोरे यांनी मुख्यमंत्र्यांना मेन राजाराम हायस्‍कूलचे महत्त्‍व सांगत नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावर मेन राजारामचे स्‍थलांतर होणार नसल्याचे सांगत त्याचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्‍वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. मागील पंधरा दिवसांपासून ‘सकाळ’ने मेन राजारामच्या स्‍थलांतराबाबत सुरू असलेल्या घडामोडींची इत्‍थंभूत माहिती मालिकेतून प्रसिद्ध केली. यानंतर मेन राजारामचे माजी विद्यार्थी, तसेच नागरिक कृती समितीने जनआंदोलन उभे करत शासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.
ऐन दिवाळीच्या सुट्टीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्‍यांसोबत मेन राजारामची पाहणी केली. यावेळी शाळेतील खोल्या रिकाम्या करणे, कार्यालयाचे स्‍थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. याबाबतचे पहिले वृत्त ‘सकाळ’ने मेन राजारामच्या स्‍थलांतराचा घाट, या मथळ्याखाली (ता. २) प्रसि‍द्ध केले. यानंतर शाळेचे आजी, माजी विद्यार्थी व शहरवासीयांमध्ये एकच खळबळ उडाली. शाळा स्‍थलांतर करून या ठिकाणी यात्री निवास व अन्य बाबी करण्याच्या गुपचूप हालचाली सुरू असल्याचे वृत्तात म्‍हटले होते. यानंतर लगेच दुसऱ्‍या दिवशी (ता. ३) पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषदेत शाळा बंद करणार नसून दुरुस्‍तीसाठी स्‍थलांतर करणार असल्याचे तसेच शाळेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधणार असल्याचे जाहीर केले.
पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर महापालिकेने चार नोव्हेंबरला तत्‍काळ बंद असलेल्या पाच शाळांची माहिती जिल्‍हा परिषेदला दिल्याने, स्‍थलांतरासाठी जोर लागल्याचे स्‍पष्‍ट झाले. यावर मनपाच्या पाच बंद शाळांची चाचपणी, या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर लगेच आंदोलनाला सुरुवात झाली. सर्व पक्षीय कृती समितीची माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत, मेन राजारामप्रश्‍‍नी सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. तसेच, पालकमंत्री केसरकर यांच्याशी चर्चा न करण्याची व त्यांना पालकमंत्री पदावरून दूर करण्याची भूमिका घेतली.
दरम्यानच्या काळात मेन राजारामच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्र्यांना एक लाख ई-मेल करण्याचा निर्धार केला गेला. तसेच तत्‍काळ ई-मेलला सुरुवात झाली. या आंदोलनाला अनेक आमदारांनी पाठिंबा दर्शवला. जिल्‍हा परिषद सदस्य राहिलेल्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी मात्र मेन राजारामबाबतची आपली आस्‍था दाखवली नाही.
आमदार विनय कोरे यांनी मेन राजाराम स्‍थलांतर करू नये, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शाळा स्‍थलांतर न करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शाळेवरून सुरू असलेले आंदोलन व पाठपुरावा आणि शाळेचे महत्त्‍व, याची माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळा स्‍थलांतर करणार नसल्याचे स्‍पष्‍ट केले.

लवकरच घोषणेची शक्यता
मुख्यमंत्र्यांनी मेन राजारामबाबत सविस्‍तर माहिती घेतली आहे. या शाळेचे स्‍थलांतर होणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत दोन दिवसांत ते सविस्‍तर शासनाची भूमिका मांडतील. शाळेच्या पुढील विकासासाठीही त्यांच्याकडून घोषणा होणे अपेक्षित आहे.
- विनय कोरे, आमदार


‘बोंब मारो’ आंदोलन आज
दरम्यान, ‘मेन राजाराम’ स्‍थलांतराबाबत शासनाने आपली भूमिका ४८ तासांत लेखी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून अधिकृत खुलासा आलेला नाही. त्यामुळेच रविवारी (ता. २०) मेन राजाराम हायस्‍कूल व भवानी मंडप येथे ‘बोंब मारो’ आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय विद्यार्थी मोर्चाने घेतला आहे. ‘मेन राजाराम’प्रश्‍‍नी शासनाने लेखी भूमिका जाहीर करावी, यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाने गुरुवारी जिल्‍हाधिकाऱ्यां‍ना निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी लेखी म्‍हणणे सादर केल्याशिवाय मेन राजारामबाबत सुरू असलेले आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडही आंदोलनाच्या तयारीत
‘मेन राजाराम’च्या आंदोलनात सातत्याने पुढे असणाऱ्या‍ संभाजी ब्रिगेडनेही आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे. अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे. रविवारी (ता. २०) आंदोलनाबाबत संभाजी ब्रिगेडकडून अधिकृत माहिती दिली जाणार आहे.