थंडी सुरु झाली...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडी सुरु झाली...!
थंडी सुरु झाली...!

थंडी सुरु झाली...!

sakal_logo
By

थंडी सुरू झाली; शेकोटी पेटू लागली...!

कोल्हापूर, ता. १९ : गुलाबी थंडीचा माहौल शहरावर जाणवत आहे. शहर अन्‌ उपनगरात शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र आहे. सकाळी अन्‌ संध्याकाळी कानटोप्या, मफलर, स्वेटर घालून लोक फिरायला, कामावर बाहेर पडत आहेत. दसरा चौकातील तिबेटी लोकांकडून स्वेटर घेण्यासाठी गर्दी होत आहे; तर पंचगंगा नदी परिसरावर पहाटे हलकेसे धुके अन्‌ पाण्याच्या पृष्ठभागावर वाफ बाहेर पडताना दिसत आहे.
राज्यातील अनेक भागात थंडीचा जोर वाढत असून यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मौसमी पाऊस सुरु होता. परिणामी, थंडीची सुरूवात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरवात झाली. तापमानही हळूहळू कमी होत आहे. कोल्हापूरचे कमाल तापमान ३०.१ अंश तर किमान तापमान १६.४ अंश नोंदवले गेले. फुलेवाडी, शिंगणापूर, वडणगे, जुना बुधवार पेठ, जैन बोर्डिंग परिसर, न्यू पॅलेस, रमणमळा, कसबा बावडा, शियेच्या बाजूने पंचगंगा नदी जाते. त्या परिसरात सकाळी अन्‌ संध्याकाळी तीव्र थंडी जाणवत आहे.
...

कोटस्‌
उत्तरेकडील प्रदेशातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात घट होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यांतील पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे आणखी पुढील काही दिवस तापमानात घट होऊन थंडी वाढू शकते.
- डॉ. युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक
...


चौकट
थंडीची निर्मिती कशी होते?
मला थंडी खूप वाजते, असे आपण म्हणतो; मात्र थंडी नेमकी कशी असते, हे अनेकांना माहिती नसते. पृथ्वी नैसर्गिकरीत्या साडेतेवीस अंशांनी कललेली आहे. तिचा पृथ्वीचा अक्ष ऋतु निर्मिती करीत असतो. ज्यावेळी सुर्याची किरणे पृथ्वीच्या भूपृष्ठावर तिरपी येतात. मग भूपृष्ठावरील उष्णतेत घट होत जाते. उष्णतेत घट झाल्याने हवेत असलेला गारवा जाणवू लागतो. थंडी वाजू लागते या प्रक्रियेला ‘हिवाळा’ म्हणतात. त्याशिवाय नैऋत्य मॉन्सून उत्तरेकडे गेल्यानंतर तो पुन्हा परत जाताना, बरोबर शीतलहरी घेऊन येतो. त्यामुळे दख्खनच्या पठारावर चार महिने हे परिणाम राहतात.