नायजेरियन खेळाडूंचा बोलबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायजेरियन खेळाडूंचा बोलबाला
नायजेरियन खेळाडूंचा बोलबाला

नायजेरियन खेळाडूंचा बोलबाला

sakal_logo
By

63433, 63406
नायजेरियन खेळाडूंना
घेतले डोक्यावर..!
कोल्हापूर संस्थानात फुटबॉल रुजला. रांगडा खेळ म्हणून कोल्हापूरकरांच्या तो जिव्हाळ्याचा विषय ठरला. पेठा-पेठांतील ईर्ष्येने फुटबॉल लाल मातीशी घट्ट झाला, तशी स्थानिक खेळाडूंनी तंत्रशुद्ध फुटबॉल खेळण्यावर पकड मजबूत केली. फुटबॉलच्या जोरावर खेळाडूंना नोकऱ्या मिळाल्या. इथल्या फुटबॉलप्रेमींनी स्थानिक खेळाडूंवर भरघोस प्रेम करताना नायजेरियन खेळाडूंनाही डोक्यावर घेतले. बलाढ्य संघांत नायजेरियन खेळाडू नाहीत, असे कधी घडले नाही. स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने कधी कधी त्यांना विरोध झालाही. त्या विरोधाला धार फारशी राहिली नाही. पुन्हा परदेशी खेळाडूंच्या प्रवेशाने नायजेरियन येथे येत राहिले. छत्रपती शाहू स्टेडियमवर नायजेरियन खेळाडूंचा बोलबाला नेहमीच राहिला.
- संदीप खांडेकर

फुटबॉल हंगामात स्थानिक जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंना खेळविण्यास परवानगी आहे. कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचा (केएसए) तसा नियम आहे. तो स्थानिक संघांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून घेतला गेला आहे. एका संघात तीन खेळाडूंपैकी दोन परदेशी खेळाडू घेणे तसे संघांच्या आर्थिक कुवतीबाहेरचे गणित. बलाढ्य संघांना मात्र ते हवे असतात. त्यांच्यातील कौशल्य इथल्या खेळाडूंत रुजावे व परदेशी खेळाडूंचा खेळ फुटबॉलप्रेमींना पाहता यावा, हा त्यामागचा उद्देश. व्यावसायिक खेळाडू म्हणून नायजेरियन खेळाडूंची ओळख महत्त्वाची ठरते. सरावाच्या वेळेचे ते पक्के असतात. आहार असो की, मैदानावरील शिस्त, त्यात ते चुकारपणा करत नाहीत. नायजेरियन खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर मुद्दाम धावून गेला, असे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. शांत डोक्याने फुटबॉल खेळण्याचे त्यांचे तंत्र विशेष आहे.
पाटाकडील तालीम मंडळातून खेळलेला मॅथ्यू, जॅक्सन, डेव्हिड, खंडोबा तालीम मंडळाचा अँथोनी उच्छैना आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळातून जेरॉल्ड, फेला, ॲमे, शिवनेरी स्पोर्टस्‌कडून गॅब्रियल खेळले. ओला, केन, क्रिस्टन यांचेही पाय मैदानावर वेगाने चालले. त्यांच्या खेळातील नजाकत फुटबॉलप्रेमींत चर्चेची ठरली. अगदी मोक्याच्या क्षणी त्यांनी सामन्यात बाजी मारण्याची संधी सोडली नाही. छत्रपती शाहू स्टेडियमवर हंगामात सर्वसाधारणपणे पाच ते सहा स्पर्धा होतात. त्यात त्यांनी त्यांची छाप उमटविण्यावर भर दिला. बेस्ट फॉरवर्ड, मॅन ऑफ द मॅचचे मानकरीही ते झाले. त्यांच्याशी संवाद साधायचा झाल्यास इंग्रजी भाषा महत्त्वाची. त्यांच्याशी भाषेपलीकडचे नाते निर्माण करण्यात इथला फुटबॉलप्रेमी कमी पडला नाही. अगदी शहरातल्या गल्ली-बोळातून ते पायी गेले तर त्यांच्यामागे बालचमूंचे टोळके असायचे.
कोल्हापुरात खेळण्यात नायजेरियन खेळाडूंना प्रतिष्ठा वाटते. त्याला कारण त्यांना इथे जसा मान मिळायचा, तशी आर्थिक रक्कमही. त्यांच्या खाण्या-पिण्यात काही उणीव भासणार नाही, याची दक्षता संबंधित फुटबॉल संघाचे व्यवस्थापन घेत राहिले. यंदाच्या हंगामासाठी नायजेरियन खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे. त्यांना किती रक्कम दिले जाते, यावर नेहमीच चर्चा होते. स्थानिक खेळाडूंच्या पदरी चांगली रक्कम पदरी पडावी, ही अपेक्षा असणे गैर नक्कीच नाही. आजघडीला इथले काही खेळाडू व्यावसायिकतेच्या अंगाने खेळू लागले आहेत. त्यासोबत गोवेकर खेळाडूंनाही इथे चांगला भाव मिळाला आहे. विकास ढाले, मार्कोस, विल्सन, आयओ, लेस्ली, सॅबी, महेश कांबळे या गोवेकर खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली.
चांगल्याचे कौतुक करण्याची कोल्हापुरी परंपरा आहे. ती प्रत्येक क्षेत्रात जपली गेली आहे. त्याला क्रीडा क्षेत्र अपवाद राहिलेले नाही. खिलाडूवृत्तीने चांगल्या खेळाला टाळ्या वाजविण्यात फुटबॉलप्रेमी कधी पडला नाही. भविष्यातही तो याच वाटेवर चालेल, हे निर्विवाद. हंगाम संपल्यानंतर परदेशी खेळाडूंना निरोप देण्यात गल्ली जमा झाल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी नाव नोंदणी झाली आहे. त्यात परदेशी खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा मैदानावर खेळ कसा होतो, याची उत्सुकता आहे. परदेशी खेळाडूंना स्थानिक खेळाडू भारी पडतात का, याचे विश्‍लेषणही होईल. अन्यथा कोल्हापूरचा फुटबॉल एका कक्षेतच फिरत राहील. महत्त्वाचे काय तर कोल्हापुरी फुटबॉलचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी शाहू स्टेडियमवर जायलाच हवे.