फुटबाँल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबाँल
फुटबाँल

फुटबाँल

sakal_logo
By

कोल्हापूर फुटबॉल ‘ग्लोबल’ हवा

कोल्हापूर : ‘जगात भारी कोल्हापुरी’ असं म्हटलं जातं. जसं कोल्हापूर हे रांगड्या कुस्ती अन् गूळ, साखर व चपलांसाठी व ‘तांबड्या-पांढऱ्या’साठी जगप्रसिद्ध, तसंच ते ‘फुटबॉलची पंढरी’ म्हणूनही कोलकाता, गोवानंतर प्रसिद्धीत आले आहे. कोल्हापूरचा फुटबॉल स्थानिक पातळीवरून म्हणाव्या तितक्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर पोहोचला नाही.
कोल्हापुरातील काहीजण वरिष्ठ अखिल भारतीय पातळीवर पदावर विराजमान असताना कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूकडून तितकी तुल्यबळ तयारी होत नाही. खेळाडू हे स्थानिक संघांशी ईर्ष्या करत राहतात. त्यातूनच दुखापतग्रस्त होतात. अशा दुखापतग्रस्त खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर ‘अनफिट’ ठरवले जाते. हे टाळण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यासाठी खेळाडूंची मानसिकता वदलणे आवश्यक आहे. कोल्हापूरच्या परिघातून जेव्हा स्थानिक खेळाडू देशातील टॉप मोस्ट संघातून प्रतिनिधित्व करतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने कोल्हापूर ही देशाची तिसरी फुटबॉल पंढरी ठरेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने कोल्हापूर फुटबॉल ‘ग्लोबल’ होईल.
कोलकाता, गोवा याप्रमाणे कोल्हापुरातही सहा महिन्यांचा फुटबॉल हंगाम भरतो. लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट उत्कृष्ट खेळाडूंसह संघांवर केली जाते. हंगामात स्थानिक पातळीवरील लीग सामने पाहण्यासाठी दररोज सरासरी सात हजारांहून, अंतिम सामन्यासाठी २५ हजारांहून अधिक फुटबॉलप्रेमी शाहू स्टेडियमवर हजेरी लावतातच. अशा प्रकारे फुटबॉल रसिकांनी डोक्यावर घेतलेले ठिकाण म्हणून अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या नामांकित फुटबॉल प्रशिक्षकांनीही दखल घेतली आहे. ‘देशातील तिसरी फुटबॉल पंढरी’ म्हणून गौरवही केला जात आहे.
कोलकाता, गोवा याप्रमाणे सर्वाधिक फुटबॉलचा चाहता वर्ग याच ठिकाणी सर्वांना पाहण्यास मिळेल. मेस्सी, नेमार, रोनॉल्डो, झिनेदिन झिदान आदी दिग्गजांचे चाहतेही याच भूमीत पाहण्यास मिळणार. एवढेच काय, येथील नावाजलेल्या ‘पाटाकडील तालीम मंडळा’चे किटही ब्राझीलसारखे, तर त्यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलबहार तालीम मंडळाचेही किट अगदी अर्जेंटिनासारखे आहे. ‘फुटबॉलची पंढरी’ असे ज्या मैदानावरून बोलले जाते, अशा शाहू स्टेडियमवरील स्थानिक संघांतील सामने पाहताना फुटबॉल खेळाडूंबरोबर समर्थकांमध्येही ईर्ष्या तर इरेला पेटणारी असते. अशी ही देशातील तिसरी फुटबॉल पंढरी नेमकी कशी आहे, याबाबत थोडक्यात केलेला हा ऊहापोह.
कोल्हापूरच्या रांगड्या कुस्तीबरोबर फुटबॉललाही मोठा प्रेक्षक वर्ग आहे. कोल्हापूर संस्थानचे राजाराम छत्रपती महाराज यांच्या आश्रयाखाली मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडामहर्षी कै. मेघनाथ नागेशकर यांच्या प्रयत्नांतून कोल्हापुरात ‘कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन’ (के. एस. ए.) ही संस्था ८ एप्रिल १९४० रोजी स्थापन झाली. तिचे ‘बोलण्यापेक्षा कृती करा’ हे ब्रीदवाक्यही महाराजांनी अंगीकारले. त्यानुसार ‘सर्वच खेळांची मातृसंस्था’ म्हणून या संस्थेकडे पाहिले जाऊ लागले. विशेषत: ‘फुटबॉल’ आणि ‘के. एस. ए.’ हे समीकरणच बनून गेले. फुटबॉल म्हटले की हक्काचे मैदान ही आवश्यक बाब होय, हे ओळखून के.एस.ए.चे तत्कालीन पेट्रन-इन-चीफ मेजर जनरल श्रीमंत शहाजी छत्रपती यांनी १९४०-४१ दरम्यान शहरातील ए, बी, सी, डी, ई असे पाच वॉर्डांच्या संघांचे सामने लीग पद्धतीने घेतले. यात प्रथमच सी वॉर्ड संघाने अजिंक्यपदही पटकाविले. कोल्हापूर फुटबॉलची मुहूर्तमेढ अशा स्वरूपाने रोवली गेली. त्यानुसार ‘के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धां’ना प्रारंभ झाला. आजही तितकाच प्रतिसाद या लीग फुटबॉल स्पर्धांना लाभला आहे. त्यात स्पर्धांचे प्रमाणही वाढत गेले आणि फुटबॉल रसिकही वाढत गेला.
कालांतराने राज्यस्तरीय, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजनही करण्यात येऊ लागले. त्यानंतर मैदानांतही सुधारणा होऊन अत्याधुनिक पद्धतीचे स्टेडियमही बांधण्यात आले. त्याची धुरा सध्याचे पेट्रन-इन-चीफ शाहू छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे, माजी खासदार संभाजीराजे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महिला समिती अध्यक्षा मधुरिमाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या फुटबॉलची घोडदौड सुरू आहे. यात देशाला अनेक फुटबॉलपटूही याच फुटबॉल पंढरीने दिले आहेत. राष्ट्रीय खेळाडूंइतकाच उत्साह येथील फुटबॉल रसिकांमध्येच दिसून येईल. विशेष म्हणजे खेळाडूंबरोबर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची सी व डी लायसेन्स पंच परीक्षा पास झालेले ४८ पंचही येथे आहेत.
गेल्या ७५ वर्षांत ठरलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार या फुटबॉल पंढरीचा हंगाम नोव्हेंबर ते १५ जून या कालावधीत होतो. यात प्रथम के. एस. ए. मानांकन लीग, नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा, अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धा, दसरा चषक, छत्रपती शाहू गोल्ड कप, मुस्लिम बोर्डिंग चषक, फुटबॉल महासंग्राम अशा पारंपरिक स्पर्धा, तर त्यात नव्याने भर पडलेल्या अटल चषक, राजेश चषक या स्पर्धा या कालावधीत घेतल्या जातात. संघांच्या मानांकनानुसार १६ संघ वरिष्ठ गटात कायमस्वरूपी खेळतात. त्यात बी डिव्हिजनमधून विजेते, उपविजेते या दोन संघांची भर पडते आणि शहरातून एकूण १८ वरिष्ठ संघ व ग्रामीणचे दोन अशा २० संघांत दरवर्षी स्पर्धा खेळविल्या जातात.


कोल्हापुरातील वरिष्ठ गटातील फुटबॉल संघ
१. शिवाजी तरुण मंडळ
२. पाटाकडील तालीम मंडळ
३. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब,
४. बालगोपाल तालीम मंडळ,
५. संध्यामठ तरुण मंडळ,
६. खंडोबा तालीम मंडळ,
७. दिलबहार तालीम मंडळ,
८. उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम,
९. संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ,
१०. कोल्हापूर पोलिस दल,
११. रंकाळा तालीम मंडळ,
१२. बीजीएम स्पोर्टस्‌,
१३. फुलेवाडी क्रीडा मंडळ,
१४. ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळ,
१५. झुंजार क्लब,
१६. सम्राटनगर स्पोर्टस्‌.
---------------------------
---------------