कोल्हापुर फुटबाँल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुर फुटबाँल
कोल्हापुर फुटबाँल

कोल्हापुर फुटबाँल

sakal_logo
By

फुटबॉल… भाग०२

फुटबॉल रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
छत्रपती शाहू स्टेडियमची क्षमता १५ हजार प्रेक्षक बसण्याची आहे. त्यानुसार हंगामात सहा स्पर्धा झाल्या असून, त्यातील अंतिम सामन्यासाठी २५ हजारांवर फुटबॉल रसिकांनी हजेरी लावली. नोव्हेंबर ते जूनपर्यंतच्या हंगामात मानाची लीग व सहाहून अधिक स्पर्धांदरम्यान २०० हून अधिक सामने या मैदानात खेळविले जातात.
--------
मानाचा तुरा
- दिनांक ३ डिसेंबर २०१० ते ३० मे २०११ दरम्यान याच फुटबॉलच्या पंढरीत आयलीग सेकंड डिव्हिजनचे सामनेही झाले. यासाठी फुटबॉल रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
- के.एस.ए.च्या शाहू स्टेडियम अर्थात फुटबॉल पंढरीच्या या मैदानात १७ जानेवारी २०१३ रोजी भारत विरुद्ध पोलंड यांच्यातील महिलांचा मैत्रीपूर्ण सामना झाला. सामन्यात भारत हरला. हा सामना पाहण्यासाठी सुमारे ५० हजारांहून अधिक फुटबॉल रसिक हजर होते.
- दिनांक २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०१७ या कालावधीत याच पंढरीत इंडियन वूमेन्स लीगमधील पात्रता फेऱ्यांचे सामने झाले. यात इस्टर्न युनियन हा संघ विजयी झाला. स्पर्धांना रसिकांतून भरभरून प्रतिसाद लाभला.
--------
आयलीग संघाचीही स्थापना
उद्योजक (दिवंगत) चंद्रकांत जाधव व ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे यांच्या पुढाकाराने ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’ या १३, १५ आणि १८ वर्षांखालील आयलीग संघाची स्थापना मे २०१८ मध्ये झाली. या संघास स्पेनचा फुटबॉलपटू व व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षक फ्लेईक्स सरोगाथी यांनी काही महिने प्रशिक्षणही दिले.
------
`वूमेन्स लीग'' स्पर्धांनाही सुरुवात
दिनांक २१ ते २७ मे २०१८ दरम्यान शाहू स्टेडियमवर प्रथमच मधुरिमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक स्वरूपात ‘कोल्हापूर वुमेन्स लीग स्पर्धा‘ प्रथमच घेतल्या. यात ‘जाधव इंडस्ट्रीज’ हा संघ विजयी ठरला. पाच संघांत घेतलेल्या या स्पर्धेत संघ व नामांकित खेळाडू असे - सोनिया राणा (ग्वाल्हेर), माहिमा खातून (कोलकाता), अंजू तमंग (सिक्कीम), मिशेल कास्टाना (गोवा), सुचिता पाटील (कोल्हापूर), श्रेया यादव (पुणे), पूजा धमण (तमिळनाडू), आफ्रिन पीभॉय (मुंबई), लॉरा इस्टिबेओ (मुंबई), पृथ्वी गायकवाड, जाबमणी तुडू (तमिळनाडू), प्यारी झा झा, शश्मिता परिडा (तमिळनाडू), पिंकी दर्जी (गुजरात), ऐश्वर्या हवालदार कोल्हापूर), सोनाली चिमटे (पुणे), रूपा मलिक (तमिळनाडू), पूजा करमळकर (तमिळनाडू), पॉली कोले (मुंबई), प्रतीक्षा मिठारी (कर्णधार), गीता दास (कोलकाता), लाको भूतिया (सिक्कीम), निशा, बनिता (हरियाणा), मृदुल शिंदे (कोल्हापूर) या राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता.
-----
व्यवस्थापनाचा उत्तम नमुना
के.एस.ए.तर्फे घेतल्या जाणाºया स्पर्धांकडे व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणूनही पाहिले जाते. हंगामात विविध स्पर्धांसह ‘ए, बी, सी, डी, ई’ या डिव्हिजनसह ग्रामीण भागातून एकूण २७१० खेळाडू फुटबॉल स्पर्धा खेळतात.
-----------
स्टार खेळाडू
भारतीय संघातून १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळलेला एकमेव महाराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याच मातीतून तयार झालेला आहे. त्याने प्रथम पुणे क्रीडा प्रबोधिनीतून शिक्षण घेतानाच पुणे एफसी व फुटबॉल महासंघाच्या ‘इंडियन अ‍ॅरोज’कडून आयएसएल आयलीग सामन्यांत खेळ केला. सध्या तो ‘जमशेदपूर एफसी’कडून खेळ करीत आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वी लंडन येथील ब्लॅकबर्न येथे फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले.
मूळचा कोल्हापूरचा व क्रीडा प्रबोधिनीचाच आणखी एक खेळाडू निखिल कदम हा पुणे एफसी, मुंबई एफ. सी., कोलकात्याचा नामांकित क्लब ‘मोहन बागान’कडून स्ट्रायकर असून त्याने मैदान गाजविले आहे. सध्या तो ‘नॉर्थ-ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, सिक्कीम’ या देशातील नामांकित संघाकडून खेळत आहे.
क्रीडा प्रबोधिनीचा तिसरा खेळाडू सुखदेव पाटील हाही येथीलच. तो पुणे एफसी, दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि आता गोवा एफसी, दिल्ली डायनास या नामांकित संघांकडून खेळत आहे. विशेष म्हणजे खेळण्यासाठी ४७ लाखांचे पॅकेजही यालाच मिळाले आहे.
रोहन आडनाईक गोव्याच्या ‘चर्चिल ब्रदर्स’कडून खेळत आहे. संकेत साळोखे हाही ‘मिनर्व्हा पंजाब फुटबॉल’कडून खेळत आहे; तर ओंकार मोरे हाही कोलकात्याच्या ‘अ‍ॅटलांटा डी’ संघाकडून खेळत आहे.
यासह पूर्वीच्या खेळाडूंमध्ये उमेश चोरगे, अरुण नरके, रघुनाथ पिसे, लक्ष्मण पिसे, अकबर मकानदार, विश्वास कांबळे, शिवाजी पाटील, किशोर खेडकर, विजय कदम, सुधाकर पाटील, कैलास पाटील, संजय चौगुले यांनीही राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून रिची फर्नांडिस यांनी प्रतिनिधित्व केले होते.
---------
फुटबॉल खेळावर प्रथमच पीएच. डी.
कोल्हापूरच्या संस्थानकालापासूनच्या फुटबॉल खेळास प्रथमच एक अभ्यास म्हणून आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निर्माण करण्यासाठी खेळाडूंवर संशोधनाची एक गरज होती. ती गरज ओळखून शिवाजी तरुण मंडळाचे माजी खेळाडू आणि फुलेवाडी क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक व स. ब. खाडे महाविद्यालय (कोपार्डे)चे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अभिजित वणिरे यांनी ‘कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंची अभिवृत्ती, त्यांना मिळणाऱ्या सामाजिक, आर्थिक स्तरावरील सुविधा’ हा एक चिकित्सक अभ्यास करून एक संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाने ‘पीएच.डी.‘ ही पदवी बहाल केली. फुटबॉल खेळावर संशोधन करणारे ते पश्चिम महाराष्ट्रातील पहिले संशोधकही ठरले .