रंकाळ्यातील सांडपाणी मार्चअखेर थांबणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळ्यातील सांडपाणी मार्चअखेर थांबणार
रंकाळ्यातील सांडपाणी मार्चअखेर थांबणार

रंकाळ्यातील सांडपाणी मार्चअखेर थांबणार

sakal_logo
By

रंकाळा पाण्याचा फोटो वापरणे

रंकाळ्याचे प्रदूषण थांबणार,
ड्रेनेज लाईनचे काम अंतीम टप्प्यात; मैलामिश्रित सांडपाणी रोखणार


उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः पावसाच्या पाण्याबरोबर पाणलोटमधील `सेफ्टीटॅंक''चे मैलामिश्रित सांडपाणी रंकाळा तलावात मिसळून होत असलेले प्रदूषण मार्चअखेरपर्यंत थांबण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमृत एक योजनेतून दुधाळी, रंकाळा तलावाच्या पाणलोटमध्ये मंजूर झालेल्या ८० किलोमीटरच्या ड्रेनेज लाईनपैकी ६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम होताच केवळ पावसाचे पाणी रंकाळा तलावात येईल. परिणामी, मोठ्या प्रमाणात प्रदूषण थांबणार आहे. याबरोबरच तलावातील पाण्याची गुणवत्ता वाढीसाठी अमृत दोन योजनेतून तयारी केली जात आहे.
रंकाळा तलावात शेजारील नाल्यातून येणारे सांडपाणी थांबण्यासाठी स्वतंत्र निधी खर्च केला. त्यातून रंकाळा भोवतीने ड्रेनेज लाईन टाकून ती दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेली. यातून नाल्यातील सांडपाणी प्रकल्पापर्यंत नेले जात होते. पावसाळ्यात मात्र नाले थेट तलावात मिसळत होते. पाणलोटमधील नागरी वस्तीत ड्रेनेज लाईन नसल्याने पावसाच्या पाण्याबरोबर सेफ्टी टॅंकचे मैलामिश्रित सांडपाणी तलावात येत होते. हा प्रकार रोखण्यासाठी अमृत एकमधील प्रस्तावातून रंकाळा पाणलोटमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्याचबरोबर इतर सहा नाले वळवणे, त्यासाठीची पाईपलाईन टाकणे आदी कामेही होती.
रंकाळा पाणलोटमधील मैलामिश्रित सांडपाणी येऊ नये यासाठी ८० किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली. सध्या त्यातील ६५ किलोमीटरची लाईन टाकून पूर्ण झाली आहे. उर्वरित १५ किलोमीटरचे काम मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यानंतर वैयक्तिक जोडण्या होऊन घरातील सांडपाणी गटरद्वारे नाल्यात न येता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे जाईल. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर गटारीतून मैलामिश्रित सांडपाणी रंकाळा तलावात येणे बंद होणार आहे. त्यासाठी ड्रेनेज लाईनबरोबर वैयक्तिक जोडणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे.

कोट
पावसाच्या पाण्याबरोबर मिसळणारे मैलामिश्रित सांडपाणी रोखण्यासाठी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. मार्चअखेरपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याबरोबरच ‘अमृत दोन’मधून निधी मिळवण्यासाठीही प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.
-आर. के. पाटील, अभियंता, ड्रेनेज विभाग.
.............................

चौकट
‘रंकाळा, लक्षतीर्थ’ साठी प्रयत्न
अमृत दोन योजनेतून तलावांतील जलचर तसेच वनस्पती यांना धोका न पोहचवता पाण्याची गुणवत्ता राखण्याची कामे होणार आहेत. पेटंट घेतलेल्या काही एजन्सीजना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेने संदीप गुरव असोसिएट या सल्लागार कंपनीसोबत काही एजन्सीबरोबच चर्चा चालवली आहे. त्यांच्याकडून योग्य हमी मिळाल्यानंतरच पाणी गुणवत्ता राखण्याच्या कामाचे प्रस्ताव केले जाणार आहेत. सध्या रंकाळा तलावासाठी १३ कोटी तर लक्षतीर्थ तलावासाठी साडेपाच कोटी रूपयांच्या प्रस्तावांना तत्वतः मान्यता मिळाली आहे.