हॉकी मैदानाची दुरुस्ती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉकी मैदानाची दुरुस्ती सुरू
हॉकी मैदानाची दुरुस्ती सुरू

हॉकी मैदानाची दुरुस्ती सुरू

sakal_logo
By

ich208,9.jpg
63628
इचलकरंजी ः १) खंजिरे मळा परिसरातील महापालिकेच्या हॉकी मैदानाची दुरवस्था झाली होती. याबाबत ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते.
63631
२) मैदानावरील निरुपयोगी वनस्पतींचे साम्राज्य दूर करीत मैदान पुन्हा सुस्थितीत करण्याच्या कामाला गती आली आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------
हॉकी मैदानाची दुरुस्ती सुरू
देखभालीअभावी दुरवस्था; ‘सकाळ’च्या बातमीनंतर कार्यवाहीस गती
इचलकरंजी, ता. २१ ः अनेक यशस्वी हॉकी स्पर्धांचे साक्षीदार असलेले खंजिरे मळा येथील महापालिकेच्या मालकीचे हॉकी मैदान पुन्हा एकदा सुस्थितीत येत आहे. मैदानाची देखभाल दुरुस्तीअभावी खूपच दुरवस्था झाली होती.
पहिल्या टप्प्यात लोकसहभागातून मैदानाची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा या मैदानात हॉकी स्टीक घेऊन पळताना खेळाडू दिसणार आहेत. यासाठी हॉकी संघटक विजय पाटील यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. याबाबत ‘सकाळ’ने सविस्तर बातमी प्रसिद्ध करीत लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीस गती आली. शहरात विविध प्रकारच्या खेळासाठी महापालिकेची मैदाने उपलब्ध आहेत. यामध्ये क्रिकेटसाठी प्रसिद्ध असे राजाराम स्टेडियम आहे. खंजिरे मळा येथे हॉकी मैदानाची निर्मिती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले यांच्या हस्ते या मैदानाचे उद्‍घाटन झाले. यानिमित्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धाही येथे झाली. त्यानंतरही अनेक छोट्या-मोठ्या हॉकी स्पर्धाही येथे झाल्या. पाच-सात वर्षांपासून मैदानाची योग्य देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संयोजक व खेळाडूंनीही मैदानाकडे पाठ फिरवली. येथे निरुपयोगी वनस्पतींची वाढ झाली होती. संरक्षक भिंती पडत चालल्या होत्या. त्यामुळे मैदानाचे अस्तित्वच नाहीसे होत चालले होते.
मात्र महापालिका सेवेतील निवृत्तीनंतर पुन्हा एकदा हॉकी मैदान सुस्थितीत करण्यासाठी संघटक विजय पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला. त्याला यश आले आहे. माजी नगरसेवक रवींद्र माने, राहुल खंजिरे, मंगेश कांबुरे, लतिफ गैबान यांच्या सहकार्यातून पुन्हा मैदान सुस्थितीत येत आहे.
रोड रोलरच्या सहाय्याने पुन्हा एकदा मैदान हॉकी खेळण्यासाठी योग्य करण्यात येत आहे. पुढील दोन-चार दिवसांत हॉकी खेळाडूंचा येथे नियमित सराव सुरू होईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
----------------
वीस लाखांचे अंदाजपत्रक तयार
हॉकी मैदानाची संरक्षक भिंत खराब झाली आहे. याशिवाय आणखी काही किरकोळ सुविधा होणे आवश्यक आहेत. त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुमारे २० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे मैदान पूर्वीसारखे सुरक्षित होणार आहे.
----------------
प्रेक्षक गॅलरीचा प्रस्ताव
हॉकी मैदानात सुमारे चार हजार प्रेक्षकांची क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी उभारण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठवल्यास शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) रवींद्र माने यांनी दिली आहे. यामध्ये खेळाडूंसाठी चेंजींग रुमचाही समावेश असणार आहे.