पोलीस बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस बदल्या
पोलीस बदल्या

पोलीस बदल्या

sakal_logo
By

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा बनावट आदेश

पुन्हा एकदा गोंधळ ः बदल्या झाल्या नसल्याची गृह मंत्रालयाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः काही दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांच्या बदल्या झालेल्या असतानाच आज पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा बनावट आदेश बाहेर पडल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली. यातून मोठा गोंधळही निर्माण झाला. यापूर्वीही अशाच पद्धतीने पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट आदेश निघाल्याने गोंधळ उडाला होता.
वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयात मतभेद आहेत. त्यामुळे या दोन विभागांच्या बदल्या गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच पोलिस अधीक्षक व आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हायरल झाली होती, त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तत्कालीन मंत्र्यांना न विचारताच या बदल्या झाल्याचा आरोप त्यावेळी झाला. त्यामुळे हे आदेशच मागे घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे आजही पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या तब्बल ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा हा गोंधळ पहायला मिळाला.
आज निघालेल्या या आदेशात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची बदली नागपूरला दाखवण्यात आली आहे तर त्यांच्या जागी यापूर्वी जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेले यशस्वी यादव यांची नियुक्ती केल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय या यादीत मिलिंद भारंबे, संजय मोहिते, के. एम. प्रसन्ना, निसार तांबोळी, रवींद्र शिसवे, कृष्णप्रकाश, संजय दराडे, आरतीसिंह, परमजितसिंह दहिया, ज्ञानेश्‍वर चव्हाण, संजय बावीस्कर, संदीप कर्णिक आदींचा समावेश आहे.
....

अभिनंदनासाठी फोन खणखणले

आज व्हायरल झालेल्या यादीत बहुंताशी अधिकारी हे बदलीला पात्र असल्याने अनेकांचा यावर विश्‍वास बसला. त्यातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन खणखणू लागले. खात्री केल्यानंतर मात्र हे आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
..........