घरफाळा चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा चौकशी
घरफाळा चौकशी

घरफाळा चौकशी

sakal_logo
By

भोसलेंसह चौघांची खातेनिहाय चौकशी
घरफाळा आर्थिक अनियमितताप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

कोल्हापूर, ता. २१ ः घरफाळा विभागामध्ये आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांच्यासह प्रभारी अधीक्षक राहुल लाड, प्रभारी सहायक अधीक्षक दीपक सोळंकी, कनिष्ठ लिपिक सागर काळे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी काढला आहे.
चौकशी अधिकारी म्हणून आनंदराव सूर्यवंशी व सादरकर्ता अधिकारी म्हणून उपायुक्त शिल्पा दरेकर, तसेच सर्व कागदपत्रांचे कस्टोडियन सुधाकर चल्लावाड यांची सादरकर्ता अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मान्यतेनुसार आदेश काढला आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) अन्वये कारवाई होणे जरुरीचे वाटत आहे असे आदेशात नमूद केले आहे. खातेनिहाय चौकशीसाठी अधिकारी व सादरकर्ता अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असल्याने चौकशी अधिकारी म्हणून सूर्यवंशी व सादरकर्ता अधिकारी म्हणून दरेकर, चल्लावाड यांची सादरकर्ता अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी चौघांची खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई केली आहे. त्यानंतर आता या नवीन चौघांची चौकशी होत असून, याशिवाय निवृत्त झालेल्या पाच जणांवरही कोणती कारवाई करायची याबाबत महापालिकेने विधिज्ञांकडून मार्गदर्शन मागवले आहे.
आतापर्यंत १३ नावांचा समावेश केला असून, त्यांच्याबाबत घरफाळा परस्पर कमी करणे, भाड्यात वाढ केली नाही, भाडेपट्टा केला नाही अशी चौकशीची कारणे आहेत. १४ प्रकरणे असून त्यातील नावे जशी समोर येतील तशा यापुढे प्रशासनाकडून नोटीस काढण्यात येणार आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल प्रकरणाबाबत या महिन्यात महापालिकेला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.