राज्य नाट्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य स्पर्धा
राज्य नाट्य स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा

sakal_logo
By

63870
.....

उत्स्फूर्त गर्दीत राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ

ज्येष्ठ अभिनेते एन. रेळेकर, मुकेश अडिगेकर यांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः सांस्कृतिक कार्य संचालयानयातर्फे आयोजित हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला आजपासून रसिकांच्या उत्स्फूर्त गर्दीत येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ झाला. सुगुण नाट्य संस्थेच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडला.
यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेते, लेखक एन. रेळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी मुकेश अडिगेकर यांच्या एकूणच कारकिर्दीबद्दल सन्मान झाला. कोल्हापूरच्या रसिकांनी आयुष्यभर भरभरून प्रेम दिले आणि त्या बळावरच सिनेमा व नाट्यसृष्टीत आमच्या परीने आम्ही योगदान देऊ शकलो, अशी कृतज्ञतेची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, सुनंदा मोरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
परीक्षक राजीव मोहोळकर (सोलापूर), जुगलकिशोर ओझा (कराड), सुरेश चव्हाण (मुंबई) यांचे नाट्य परिषदेच्या संचालक सीमा जोशी, दिग्दर्शक अजय कुरणे, अभिनेता संजय मोहिते, प्रसाद जमदग्नी यांच्या हस्ते स्वागत झाले. पंडित कंदले यांनी स्पर्धेचा उद्देश व कोल्हापूर केंद्राची परंपरा उलगडली. स्थानिक समन्वयक प्रशांत जोशी यांनी स्वागत केले.
दरम्यान, स्पर्धेत एकूण १९ प्रयोग सादर होणार असून पंधरा डिसेंबरपर्यंत स्पर्धा रंगणार आहे. रोज सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी चारनंतर नाट्यगृहावर प्रवेशिका उपलब्ध होणार असून आज पहिल्याच दिवशी रसिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
.....
चौकट
महाराष्ट्राला देशाची
सांस्कृतिक राजधानी बनवूया
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. राज्यातील एकोणीस केंद्रे आणि गोव्यात ही स्पर्धा होत असून हजारो हौशी रंगकर्मींचा या नाट्याविष्कार अनुभवायला मिळणार आहे. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करत असून पुरस्कार, पारितोषिके आणि मानधनाची रक्कमही येत्या काळात वाढवली जाणार आहे. देशाच्या एकूणच विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे असून महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. हीच परंपरा नेटाने पुढे नेत सारे मिळून महाराष्ट्राला देशाची सांस्कृतिक राजधानी बनवूया, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
....

आजचे नाटक
- फुटबॉल
- तुकाराम माळी तालीम मंडळ
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी सात वाजता
...........