रंकाळा जलसंपदा जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा जलसंपदा जागा
रंकाळा जलसंपदा जागा

रंकाळा जलसंपदा जागा

sakal_logo
By

64324
रंकाळ्यातील ४० गुंठे जागेसाठी
पालिकेचे ‘पाटबंधारे’कडे प्रयत्न
पत्र देणार; सुशोभीकरणासाठी करणार वापर
कोल्हापूर, ता. २३ : पाटबंधारे विभागाने रंकाळा तलावाचा ताबा महापालिकेला दिला असला तरी त्यातील जुना वाशी नाक्याजवळील ४० गुंठे जागा अजूनही ताब्यात आहे. तिथे या विभागाचे यांत्रिकी शाळा, भांडार आहे. तलावाभोवतीने सुशोभीकरण करण्यासाठी ही जागा ताब्यात मिळावी म्हणून महापालिका पत्र देणार आहे. त्याशेजारील मत्स्यबीज केंद्राची जागा मत्स्य विभागाच्या ताब्यात आहे.
रंकाळा तलावाचा ताबा १९९४ मध्ये पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे दिला. त्यावेळी करार करताना सध्या जुना वाशी नाक्याजवळ असलेल्या या विभागाच्या यांत्रिकी शाळा व भांडारची इमारती व जागा सोडून ताबा दिला होता. तसेच मत्स्यबीज केंद्रासाठी शेजारील जागा राहील, असे नमूद केले होते. महापालिका टप्प्याटप्प्याने रंकाळा तलावाभोवती सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण सुरू केले आहे. जुना वाशी नाक्याजवळील खणीच्या परिसरात शाहू उद्यान विकसित करण्यात केले. त्यानंतरची जागा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे. या जागेतून तांबट कमानीकडे जाण्यासाठी पूल बांधला आहे. तिथे फिरण्यास येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. सध्या महापालिका तलावाभोवतीने सुशोभीकरणाचा प्रयत्न करत आहे. पाटबंधारे विभागाची जागा ताब्यात आल्यास तिथपर्यंत पादचारी मार्ग, तसेच इतर सुशोभीकरण महापालिकेला करता येणार आहे.
४० गुंठे जागा तलावाच्या काठावर आहे. ती ताब्यात मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी इस्टेट विभागाने प्रयत्न केला होता. त्यावेळी ही प्रक्रिया पुढे गेली नव्हती. आता पुन्हा ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इस्टेट विभागाकडून त्याबाबतची प्रक्रिया राबवली जावी यासाठी पत्र दिले जाणार आहे.
-------------
चौकट
जागेचा वापर सुशोभीकरणासाठी
पाटबंधारे विभागाने महापालिकेला जागा ताब्यात देताना फक्त सुशोभीकरणासाठी तिचा वापर करावा, असे करारात म्हटले आहे. तिथे कायमस्वरूपी बांधकाम करण्यासाठी शासनाकडून परवानगी घ्यावी लागेल, असे नमूद केले आहे. हा करार पाहता त्या विभागाकडे असलेली ४० गुंठे जागाही सुशोभीकरणासाठी वापरावी लागेल असे दिसते. तिथे अन्य वापरासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
--------------
कोट
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी इस्टेट विभागाकडून प्रयत्न केले होते. आताही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांना पत्र दिले जाईल.
- अनुराधा वांडरे, अभियंता, प्रकल्प शाखा