रस्त्यावर शिस्त कमी खोळंबा जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर शिस्त कमी खोळंबा जास्त
रस्त्यावर शिस्त कमी खोळंबा जास्त

रस्त्यावर शिस्त कमी खोळंबा जास्त

sakal_logo
By

64128
इचलकरंजी : ग्रीन सिग्नल सुरू असताना मधून नागरिक जात आहेत.

रस्त्यावर शिस्त कमी खोळंबा जास्त
इचलकरंजीतल चौकांत वाहतूक पोलिस कमीच; सिग्नल यंत्रणा असूनही विस्कळीतपणा
इचलकरंजी, ता. २८ : शहरातील रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहनधारकांना शिस्त कमी खोळंबा अधिक होत आहे. ग्रीन सिग्नल सुरू झाल्यानंतर ही पादचारी व सायकलधारक बिनधास्तपणे रस्ता ओलांडत असतात, तर सिग्नल चौकामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. ॲब्युलन्स, अग्निशामक वाहने यांचाही वावर आल्याने वाहतूक सुरळीत होण्याऐवजी अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. सिग्नल यंत्रणेबाबत पादचारी, सायकलधारकांसह वाहतूक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर व मोठी बाजार पेठ असल्याने दररोज सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक बाहेरून येत असतात, तर शहरातील वाहनधाकरकांची संख्या वेगळीच आहे. त्यामुळे शहरास वाहतूक समस्येने ग्रासले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण असावे, वाहतूक कोंडी होऊ नये, अपघातांना आळा बसावा यासाठी शहरातील राजवाडा चौक, मलाबादे चौक, प्रांत कार्यालय चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजर्षी शाहू पुतळा चौक, डेक्कन चौक अशा सहा ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर काही प्रमाणात वचक निर्माण झाला आहे, मात्र सिग्नल यंत्रणेचे नियम केवळ वाहनधारकांकरिताच आहेत, असा समज पादचारी व सायकलधारकांमधून होत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले जाऊन वाहतूक विस्कळीत होताना दिसते.
पादचारी व सायकलधारक वाहतुकीचे नियमांचे पालन करीत नसल्याने त्याचा परिणाम वाहनधारकांवर होताना दिसतो. सिग्नल ग्रीन लागण्याच्या आधीच वाहनधारकांत प्रथम जाण्याची चढाओढ सुरू असते. त्यातच कोणी पादचारी किंवा सायकलधारक आडवा आला, तर अनेकवेळा अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये नागरिकांना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. सिग्नल चौकांमध्ये वाहतूक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना येथे कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहन वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्रतीक्षा न करता नागरिकांमधून सिग्नल नियमावलीचे प्रबोधन होणे गरजेचे झाले आहे.
---------------
चौकट
अल्पवयीन वाहनचालक वाढले
सिग्नल सुरू असतानाही मधून जाण्यामध्ये वृद्ध, विद्यार्थी यांची संख्या अधिक आहे, तर शहरात अल्पवयीन वाहनचालकांची संख्या वाढली आहे. त्यांचे वेगावर नियंत्रण नसते. तसेच वाहतूक नियमांपासून ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे अशा वाहनचालकांकडून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अल्पवयीन वाहनचालकांना आळा घालणे आवश्यक बनले आहे.
----------
कोट
नागरिकांनी चालताना झेब्रा क्रॉसचा वापर करावा, सिग्नल सुटल्यावर वाहनांना प्रथम जाण्यासाठी मार्ग सोडावा, रस्ता ओलांडताना वाहने येत नसल्याची खात्री करावी. वाहतूक नियमांचे पालन करावे.
- विकास अडसूळ, सहायक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, इचलकरंजी