राज्य नाट्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य स्पर्धा
राज्य नाट्य स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा

sakal_logo
By

64133
कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेत मंगळवारी श्री तुकाराम माळी तालीम मंडळाने सादर केलेल्या ‘फुटबॉल’ या नाटकातील एक प्रसंग.

तरुणाईच्या डोळ्यात
जळजळीत अंजन...
‘फुटबॉल’
कतारमध्ये फुटबॉल विश्‍वचषकासाठी आता जगभरातील बलाढ्य संघ लढू लागले आहेत. या स्पर्धेचा साऱ्या जगभरात माहोल आहे आणि फुटबॉल नसानसांत भिणलेल्या कोल्हापुरात तर चौकाचौकांत त्याची झलक अनुभवायला मिळते आहे. याच फुटबॉलमय माहोलाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य नाट्य स्पर्धेतही मंगळवारी ‘फुटबॉल’ या नाटकाचा प्रयोग रंगला. साहजिकच या प्रयोगालाही रसिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. यानिमित्ताने फुटबॉलच्या मैदानावरील सळसळती ऊर्जा रंगमंचावर अवतरलीच. त्याशिवाय फुटबॉल समर्थकांच्या राडेबाजीवर या प्रयोगाने तरुणाईच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले. श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या टीमने हा प्रयोग सादर केला.
ब्रिटिश नाटककार पीटर टेरसन यांचे हे मूळ नाटक. याच नाटकाचा स्वातीलेखा सेनगुप्ता यांनी हिंदी आणि त्यानंतर चंद्रकांत कल्लोळी यांनी मराठी अनुवाद केला. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेतच प्रत्यय नाट्य संस्थेने पहिल्यांदा स्थानिक रंगभूमीवर या नाटकाचा प्रयोग सादर केला आणि अनेक बक्षिसांची लयलूट केली. अभिनेता विकास पाटील याच्या करिअरला याच नाटकानं एक वेगळं वळण दिलं. अर्थात या साऱ्या आठवणींनाही यंदाच्या प्रयोगामुळे उजाळा मिळाला.
फुटबॉल हा खेळ कोलकत्त्यात प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे आणि काही चाहत्यांतील ईर्ष्या, आपल्या संघासाठीचे समर्थन, विरोधी संघांबद्दलचा राग या साऱ्या गोष्टीही त्याच्या कैकपटीने टोकाच्या आहेत. स्वतः फुटबॉल खेळणार नाही; पण ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर अमूक अमूक संघाचा समर्थक म्हणून अभिमानानं मिरवणाऱ्या अशा काही चाहत्यांची ‘जगात फुटबॉलशिवाय दुसरं काहीच नाही’, ही ठासून भरलेली मानसिकता आणि त्यातचं त्यांनी गुरफटून जाणं, या गोष्टींचा हे नाटक सर्वांगीण वेध घेते. अर्थात नाटक कोलकत्त्यात घडत असले तरी फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकरांना ते आपल्याच अवतीभवती घडत असल्याची जाणीव होत राहते, हेच या प्रयोगाचे खरे यश आहे. कारण कोलक‍त्यातील हीच परिस्थिती गेली काही वर्षे कोल्हापूरचे फुटबॉलविश्‍वही अनुभवते आहे. नाटकाचा अठरा वर्षीय नायक हरी असो किंवा त्याचा आयडॉल शंकर. असे अनेक हरी, शंकर कोल्हापुरातील पेठापेठांतच नव्हे, तर आता ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत.
------------------
पात्र परिचय
- प्रतीक कुलकर्णी (हरी), नीलेश बोडके (शंकर), सुषमा शितोळे (मावशी), विक्रांत कुंभार (विनोद), अमृता खांडेकर (अनिता), आर्या जुगदार (सीता), ऋषीकेश जोशी (अंजन), रोहित कांबळे (वर्गशिक्षक, डॉक्टर, युवक), आकाश पोवार (खेळ शिक्षक, क्लबवाला, ऑफिसर), गोपी वर्णे (पोलिस), मुकुंद जोशी (हेडमास्तर), नरेंद्र देसाई (बन्सीमामा), राजेंद्र मोरे (मोहनमामा), मंगेश कांबळे (सोहनमामा), पारस सोळंकी (महाशय व बाबूजी), प्रवीण पुजारी (मॅजिस्ट्रेट), प्रतीक गोरनाळे, वैष्णवी पोरे, देवयानी देसाई, अक्षय प्रभू, श्रेयस पाटील, सोनाली पिसे, ओम ऐतावडेकर (विद्यार्थी, समर्थक व इतर).
---------------
- मूळ लेखक : पिटर टेरेसन,
- मराठी अनुवाद : चंद्रकांत कल्लोळी
- दिग्दर्शक : ऋषीकेश जोशी
- संगीत : नरहर कुलकर्णी, आर्चित रुकडे- गीते : माया पंडित
- प्रकाश योजना : कपील मुळे, सिद्धराज मिरजे
- नेपथ्य : नीलेश बोडके, प्रेम देवकुळे
- नृत्यदिग्दर्शन : देवयानी देसाई
- वेशभूषा : अमृता खांडेकर
- रंगभूषा : शशी यादव
- सरोद वादन : विजया कांबळे
- प्रसिद्धी : शेखर गुरव, स्नेहलराज संकपाळ, सुरेश पाटील.
---------------
आजचे नाटक
- नाव झालं पाहिजे
- संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्था
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी सात वाजता