सलाईन पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलाईन पुरवठा
सलाईन पुरवठा

सलाईन पुरवठा

sakal_logo
By

सलाईनवर महिन्याला दीड कोटीची उलाढाल

दहा वर्षांत मागणी दुप्पट ः सलाईन निर्मिती प्रकल्पास कोल्हापुरात वाव

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः आजारी व्यक्ती अशक्त झालेली असते, त्याच्या अंगातील ताकद कमी झालेली असते. अशा रुग्णाच्या अंगात ताकद येण्यासाठी त्याला सलाईन लावले जाते. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णालयाची वाढती संख्या लक्षात घेता सलाईनच्या औषध मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यासोबत बाहेरच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी कोल्हापुरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सलाईन व्यवसायात महिन्याकाठी दीड कोटीची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता स्थानिक स्तरावर सलाईन निर्मिती प्रकल्प उभारणीस वाव असल्याची बाब ठळक होत आहे.

कोणताही आजार झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात जाण्याबाबत जागृती वाढली, रुग्णापाठोपाठ रुग्णालयांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वैद्यकीय व्यवसायावरील विश्वास दृढ होत आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी रुग्णालयांची संख्या जवळपास दीड हजाराच्या घरात होती. सध्या ही संख्या तीन हजारांपर्यंत पोहचली आहे. ग्रामीण भागात चार बेडच्या दवाखान्यांपासून ते स्वयंसेवी संस्थांची १०० ते १५० बेडची रुग्णालये, साडेतीनशे शासकीय रुग्णालये या सर्वांची मिळून २० हजार बेडची सुविधा आहे. कोल्हापूरच्या पन्नासभर रुग्णालयांत कर्नाटक सीमाभागासह सांगली, सातारा, कोकणातील रुग्ण उपचारासाठी येतात. यातूनच कोल्हापूरची ओळख ‘मेडिकल हब’ म्हणून होत आहे.
अनेक शस्त्रक्रिये वेळेला तीन दिवस ते दीड महिना रुग्णालयात उपचार घेतात. याशिवाय ग्रामीण भागात खासगी क्लिनिकमध्येही दोन-चार बेड टाकून नियमित आजारातील पण अत्यवस्थ रुग्णांना सलाईन लावले जाते. यातून सलाईनची मागणी झपाट्याने वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी दिवसाला एका घाऊक औषध दुकानातून साधारण पाच-सहा सलाईनची विक्री होत होती. त्यात आता दुप्पट वाढ झाली. या सर्व पार्श्वभूमीवर सलाईनची वाढती मागणी असताना परराज्यातून किंवा जिल्ह्यातून सलाईन मागवावे लागते, त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातच खासगी सलाईन उत्पादन प्रकल्प उभारणीस मोठा वाव असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कोट….
‘डेस्‍ट्रोज’ नियमित प्रकारात वापरले जाणारे हे सलाईन आहे. त्यात साखर, मिठाचे पाणी असते. काही सलाईनमध्ये ग्लुकोज असते. अशा नियमित सलाईनमधून रुग्णाच्या शरीरात ताकद वाढते. म्हणून रुग्ण दाखल होताच त्याला सलाईन लावले जाते.
- मदन पाटील, संचालक, केमिस्ट असोसिएशन, कोल्हापूर.

सलाईनचे ७० प्रकार उपलब्ध
नियमित आजारासाठी लागणारे सलाईन, किडणी आजार किंवा प्रत्यारोपणासाठी, लिव्हरचे आजार, कावीळ, हृदयविकार, मेंदू विकार, शस्त्रक्रियेसाठीच्या विविध गंभीर आजारात वेगवेगळ्या प्रकारचे सलाईन वापरले जाते. यात फक्‍त प्रोटिनचा पुरवठा करणारे सलाईन स्वतंत्र असते. नियमित सलाईन २२ रुपयांपासून मिळतात. काच व बाटल्यांची कमतरता तसेच हाताळणीत फुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्लास्टिक बॉटल किंवा पिशवीत सलाईन मिळते. ते हाताळण्यास सोपे तसेच दोन वर्षे टिकते.