आजऱ्यातील रब्बीचे क्षेत्र घटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यातील रब्बीचे क्षेत्र घटणार
आजऱ्यातील रब्बीचे क्षेत्र घटणार

आजऱ्यातील रब्बीचे क्षेत्र घटणार

sakal_logo
By

आजऱ्यातील रब्बीचे क्षेत्र घटणार
---
२५ हेक्टरने लागवड कमी; ऊस क्षेत्रात वाढ, हंगाम लांबला
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः तालुक्यात रब्बी पिकाचे क्षेत्र घटणार आहे. यंदा २५ हेक्टरने क्षेत्र घटेल. गेल्या वर्षी १९० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली होती. यंदा १६५ हेक्टर होणार आहे. वन्यप्राण्यांचा वाढता त्रास, ऊस क्षेत्रात होणारी वाढ व यंदा पावसामुळे लांबलेला पेरणीचा हंगाम यामुळे रब्बीचे क्षेत्र घटल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. तालुक्यात साधारणतः खरिपाची कापणी झाल्यावर रब्बी पिकांची लागवड होत होती. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत लागवड होत होती. यंदा परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत राहिल्याने सुगीचा हंगाम लांबला. त्यामुळे खरीप पिकांची कापणी १५ दिवस पुढे ढकलली गेली. त्यामुळे २० ते २५ दिवसांनी रब्बीचा हंगाम पुढे ढकलला गेला.
जमिनीला वापसा आला नसल्याने रब्बी पिकांची पेरणी वेळेवर झाली नाही. अजूनही रब्बी पिकांची पेरणी होत आहे. यंदा हरभरा १००, ज्वारी २५, गहू ५, मसूर १५, वाटाणा ५, कांदा १५ हेक्टर अशी १६५ हेक्टरवर रब्बी पिकाची लागवड होईल. गेल्या वर्षी १२५ हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड झाली होती. यंदा २५ हेक्टरने लागवड कमी होणार आहे. हरभरा पिकाच्या दिग्विजय या जातीच्या बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. मसुरीचेही वाटप केले. हरभरा व मसूर यांचे प्रायोगिक तत्त्वावर प्लॉट केले जाणार आहेत. लाकूडवाडी, सुळे, हांदेवाडी, कोळिंद्रे, भादवण, भादवणवाडी, मडिलगे, उत्तूर, मुमेवाडी, बहिरेवाडी, धामणे, बेलेवाडी, झुलपेवाडी, आरदाळ, पेंढारवाडी यासह काही गावांत रब्बी पिकाची लागवड सुरू आहे. बहिरेवाडी येथे कांद्याची १५ हेक्टरवर लागवड केली जाते. उन्हाळी पीक भुईमूग याची लागवड देवकांडगाव, हरपवडे, कोरीवडे, पेरणोली, साळगावमध्ये सुरू आहे.
------------
ऊसाखालील क्षेत्र वाढणार
तालुक्यात २५ वर्षांपूर्वी रब्बीचे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र होते. बदलते हवामान, जंगली जनावरांचा त्रास, वाढते ऊस क्षेत्र यामुळे ते घटत गेल्याचे दिसते. यंदा तालुक्यात ऊस क्षेत्र सुमारे पाच हजार ७०० हेक्टरपर्यंत जाऊन सुमारे ८०० हेक्टर वाढ होण्याचा अंदाज आहे. हत्ती, गवे, वनगाई यासह वानर, मोर व लांडोर यांचा उपद्रव शेतीत वाढला. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक घेण्यास उत्सुक नाहीत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विविध सूचना मिळूनही रब्बी पिकाखालचे क्षेत्र वाढलेले नाही.