व्हराडकर, लिमयेंच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ः श्रीमंत शाहू महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हराडकर, लिमयेंच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ः श्रीमंत शाहू महाराज
व्हराडकर, लिमयेंच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ः श्रीमंत शाहू महाराज

व्हराडकर, लिमयेंच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ः श्रीमंत शाहू महाराज

sakal_logo
By

64268
कोल्हापूर : कर्नल शिवानंद वराडकर व सुनील लिमये यांचा सत्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केला. या वेळी डावीकडून जयेश कदम, शैलेश बलकवडे, श्रुती वराडकर, रोहिणी लिमये, राहुल रेखावार, किसन भोसले. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

वराडकर, लिमयेंच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; दोघा अधिकाऱ्यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये आणि कर्नल (निवृत्त) शिवानंद वराडकर यांचा अनुभव मोठा आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. लिमये यांच्या मार्गदर्शनाने आपण वन्यजीव आणि माणूस यांच्या संघर्षावर मात करू शकू, तर वराडकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण लष्करात जाऊ शकतील. आपण त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले.
निवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये व कर्नल (निवृत्त) शिवानंद वराडकर यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या सत्काराचे आयोजन शाहू स्मारक येथे केले होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दोघांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरवण्यात आले. या वेळी शाहू महाराज बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
किसन भोसले यांनी प्रास्ताविक केले. बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, बाळासाहेब कलशेट्टी यांनी मनोगतातून लिमये आणि वराडकर यांच्या सोबतच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी मनोगत व्यक्त केले. कर्नल वराडकर म्हणाले, ‘‘आपले काम प्रामाणिकपणे करायचे. कधीही कोणावार अन्याय करायचा नाही आणि कोणाचा अन्याय सहनही करायचा नाही, हा कोल्हापुरी बाणा मी कायम जपला. त्याचा कधी तोडा जरी झाला असला तरी त्याची खंत नाही. या कोल्हापुरी बाण्यामुळेच मी माझी लष्करातील खडतर कारकीर्द यशस्वी करू शकलो. भविष्यात नेहमीच कोल्हापूरकरांच्या सेवेत राहीन.’’ सुनील लिमये म्हणाले, ‘‘मित्रांनी मित्राचा केलेला सत्कार हा वेगळा अनुभव आहे. आमचे आयुष्य नेहमी जयेश कदम, राजू खटावकर आणि सगळ्या मित्रांच्या भोवती फिरत असते. त्यांचे स्थान जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापुरात जन्माला आलो. इथे शकलो याचा अभिमान वाटतो. १२ वी नंतर आयुष्याच्या निराशजनक काळात आमच्या शिक्षकांनी लढण्याचे बळ दिले. त्या जोरावरच इथपर्यंत मजल मारू शकलो. इथे अधिकारी म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. सर्वांनी खूप प्रेम आणि आधार दिला. भविष्यात आम्ही सारे मित्र कोल्हापूरसाठी नक्कीच काही तरी करू. कोल्हापूरच्या ऋणांची कधीच उतराई होणार नाही.’’