क्राईम बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम बैठक
क्राईम बैठक

क्राईम बैठक

sakal_logo
By

निवडणुकांना गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या
पोलिस अधीक्षक बलकवडे; कायदा-सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या ‘क्राईम’ बैठकीत सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे पूर्वीचे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वादग्रस्त लोकांची यादी तयार करा, निवडणुकांना गालबोट लागणार नाही, कायदा-सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज क्राईम बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या.
विविध निवडणुका, आंदोलने यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न आगामी काळात निर्माण होऊ नये, या उद्देशाने आज पोलिस अधीक्षक कार्यालयातही बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक उपस्थित होते.
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, फसवणुकीच्या घटनांत ताबडतोब गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करणे, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणा राबवणे आणि चक्काजाम आंदोलनासाठी बंदोबस्त देणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच ऊस तोडीसंदर्भात शेतकरी आणि वाहतूकदार यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. अशा घटनांत तत्काळ गुन्हे दाखल करावेत. वाद, दूध, विकास सेवा संस्था आणि ग्रामीण पातळीवरील विविध संस्थांच्या निवडणुकीतील वाद उफाळून येण्यापूर्वीच नियंत्रण ठेवावे. यासाठी वादग्रस्त लोकांची यादी तयार करून कायदा-सुव्यवस्था राबवण्याच्या दृष्टीने वातावरणनिर्मिती करावी. यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), स्थानिक पोलिस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार करून फसवणूक करणाऱ्यांना अटक करा. जनप्रबोधनासाठी आणि कायदा राबवण्यासाठी कोपरा सभांवर अधिक भर देण्याच्याही सूचना बलकवडे यांनी दिल्या.

चौकट
‘रेकॉर्डवरील गुन्हेगारांची वर्गवारी करा’
गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी तेथे नशा, अश्‍लील चाळे करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा. गडप्रेमींनी कायदा हातात घेऊ नये यासाठी प्रयत्न करा. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची वर्गवारी करा. त्यानुसार एमपीडीए, तडीपार, मोका अशा गुन्ह्यांखाली त्यांच्यावर कारवाई करा, अशाही सूचना बलकवडे यांनी दिल्या.

चौकट
‘पोलिसांनी लॉजिंगची तपासणी करावी’
महिलांविरोधातील गुन्ह्यांचा तपास गतीने झाला पाहिजे. पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी विविध पथकांची निर्मिती करा. निर्भया पथकाने कारवाया केलेल्या विनयभंग, बलात्कार या गुन्ह्यांचा तपास वेगाने झाला पाहिजे. निर्जण, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांवर अश्‍लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई करा. लॉजिंग, यात्री निवासमध्ये येणाऱ्या जोडप्यांची कागदपत्रे घेऊन त्यांचे रेकॉर्ड ठेवले पाहिजे. पोलिसांनी लॉजिंगची तपासणी करावी, अशाही सूचना बलकवडे यांनी दिल्या.