मेन राजाराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजाराम
मेन राजाराम

मेन राजाराम

sakal_logo
By

मेन राजारामचे स्थलांतर नाही
पालकमंत्री केसरकर ः विकासासाठी भरीव निधी देणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर सातत्याने जिल्ह्याचा विकास व्हावा, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अंबाबाईला येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी परिसरातील सरकारी इमारतींची पाहणी केली; मात्र मेन राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराच्या कोणत्याही प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही, असे पत्रक पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे.
मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार नाही, याबाबत जाहीर केले होते. तरीही गैरसमज झाला व त्यातून आंदोलन होत असल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र मेन राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराच्या कोणत्याही प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही. मेन राजाराम हायस्कूलला भेट दिली असताना विद्यार्थ्यांच्या सोयी- सुविधांबाबत आवश्यक बाबींची नोंद घेतली असून, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा वर्षभरात उभारण्यात येतील. विकासासाठी भरीव निधी देणार आहे, अशी ग्वाहीही श्री. केसरकर यांनी पत्रकात दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे, की आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने व सहकार्याने कोल्हापूरचा दसरा दिमाखाने साजरा झाला. पुढील वर्षापासून त्याला राज्याचा उत्सव हा दर्जा देण्यात आल्याने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून म्हैसूरच्या दसऱ्याप्रमाणे भव्य सोहळा साजरा केला जाईल. राजस्थानच्या जयपूर ऐवढेच सौंदर्य, उत्कृष्ट ऐतिहासिक इमारती व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांचा जाज्वल्य वारसा या शहराला लाभला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा निवास या शहरात आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनण्याकरिता आवश्यक ते सर्व कोल्हापूर शहरात आहे. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे आकर्षण बनावे, असा सर्वांचा प्रयत्न आहे. आयटी पार्क, क्रीडा संकुल, प्रशासकीय संकुल असे अनेक प्रकल्प कोल्हापुरात आणण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न आहे. शाहू मिलचे गतवैभव उभे करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
त्यांनी म्हटले आहे, की अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची व विशेषतः महिलांची गैरसोय होते. त्यामुळे मंदिर परिसरात विविध सुविधा करण्याचा प्रयत्न आहे.
या संदर्भात या भागात असलेल्या सर्व शासकीय इमारतींची पाहणी केली. यात मेन राजाराम हायस्कूल या ऐतिहासिक इमारतीसही भेट दिली होती. या वास्तूमधील कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला, ती सर्व सरकारी कार्यालये आहेत. त्या कार्यालयांमध्ये मेन राजाराम कॉलेज या ऐतिहासिक इमारतीचा समावेश नसल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी पत्रात म्हटले आहे.

सर्वपक्षीय कृती समितीकडे लक्ष
‘मेन राजाराम’च्या स्थलांतराला सर्वपक्षीय कृती समितीने कडाडून विरोध केला होता. कृती समितीने पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तो मंगळवारी संपला. त्यामुळे समितीने दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कृती समितीच्या निर्णयाकडे आता लक्ष आहे.