आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम - पंचमहाभूत महोत्सवाच्या’ बोधचिन्हाचे आज अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम - पंचमहाभूत महोत्सवाच्या’ बोधचिन्हाचे आज अनावरण
आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम - पंचमहाभूत महोत्सवाच्या’ बोधचिन्हाचे आज अनावरण

आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम - पंचमहाभूत महोत्सवाच्या’ बोधचिन्हाचे आज अनावरण

sakal_logo
By

‘सुमंगलम’ महोत्सवाच्या’ बोधचिन्हाचे आज अनावरण
२० ते २६ फेब्रुवारीदरम्यान कणेरी मठावर होणार सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः कणेरी येथील श्री सिद्धगिरी मठातर्फे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘सुमंगलम’ या पंचमहाभूतांवर आधारित सोहळ्याचे आयोजन केले आहे. पाचशे एकरमध्ये होणाऱ्या या उत्सवाला देशासह जगभरातून ३० लाख लोक उपस्थित राहणार आहे. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असून, वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होईल. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २५) होईल. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पंचगंगा घाट येथे हा कार्यक्रम होईल.
यावेळी पर्यावरणपूरक हजारो गोमय पणत्‍या प्रज्वलित करून उत्सवाच्या तयारीची मुहुर्तमेढ रोवली जाईल. तसेच पंचमहाभूत तत्वांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व उत्सवाच्या थिम सॉंगचेही अनावरण होईल. बोधचिन्हाची निर्मिती स्वच्छता अभियान लोगोचे निर्माते अनंत खासबागदार व शिरीष खांडेकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेस शंकर पाटील, डॉ. संदीप पाटील, माणिक पाटील चुयेकर, डॉ. रविंद्र सिंग, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील उपस्थित होते.

दृष्टीक्षेपात सोहळा...
० महोत्सवात एकूण एक हजार स्टॉल उभारणार
० महोत्सव व पार्किंगसाठी पाचशे एकर जागा
० पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी मेस्त्री, पंक्चरवाल्यांची सेवा
० देशभरातील ग्रामवैद्यांचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांचे तीन दिवसांचे अधिवेशन
० एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील छोट्या अवजारांचे प्रदर्शन
० गृहिणी व बेरोजगारांसाठी कुटिरोद्योगांचे प्रदर्शन
० स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र ॲपची निर्मिती
० देशी बीजांचे एकत्रित प्रदर्शन भरवणार
० दररोज चार लाख लोकांची जेवणाची व्यवस्था
० जेवणाबाबत आठशे गावात आवाहन करणार
० प्रत्येक राज्यातील कमीत कमी दोनशे पर्यावरणवादी, अभ्यासू लोकांचा सहभाग
० दोनशे डॉक्टर मिळून आयुर्वेदीक गॅलरी उभारणार व त्याबाबत माहिती देणार