‘गोडसाखर’ चालवण्याचा आठ दिवसात निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’ चालवण्याचा आठ दिवसात निर्णय
‘गोडसाखर’ चालवण्याचा आठ दिवसात निर्णय

‘गोडसाखर’ चालवण्याचा आठ दिवसात निर्णय

sakal_logo
By

64460
-----------------------------
‘गोडसाखर’ चालवण्याचा आठ दिवसांत निर्णय
डॉ. प्रकाश शहापूरकर : इथेनॉल प्रकल्पाची वर्षात उभारणी करण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : कारखान्याच्या उत्कर्षासाठी एकहाती सत्ता देण्याचे आवाहन निवडणूक प्रचारात केले होते. त्याला सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या आठ दिवसांत कारखान्याचे पुनरावलोकन केले जाईल. त्यानंतर यंदाच्या हंगामात कारखाना सुरू ठेवायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गडहिंग्लज साखर कारखान्याचे (गोडसाखर) नूतन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी स्पष्ट केले. वर्षभरात इथेनॉल प्रकल्प उभारण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातर्फे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर सत्कार कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉ. शहापूरकर बोलत होते. कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम झाला.
डॉ. शहापूरकर म्हणाले,‘कारखान्याची आजची अवस्था अज्ञानापोटीची नसून जाणूनबुजून झालेली आहे. कारखाना विकला तरी ४७ कोटींची देणी शिल्लक राहतात. इथेनॉल प्रकल्प सुरु झाल्याशिवाय कारखाना फायद्यात येणार नाही. त्यामुळे इथेनॉलसाठी पंधरा दिवसांत जिल्हा बँकेकडे कर्जाचे प्रकरण दिले जाणार आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते इथेनॉल प्रकल्पाचे उद्‍घाटन करूनच पुढील हंगाम सुरु केला जाईल. दोन वर्षांत कारखान्याचे विस्तारीकरण करुन साडेपाच ते सहा लाख टन गाळपाचे तर पाच वर्षांत कारखाना कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.’
उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले, ‘निवडणुकीत कारखाना चालू करणारे आणि बंद करुन जाणारे हे दोनच प्रवाह होते. सभासदांनी चालू करणाऱ्यांवर विश्वास दाखविला आहे. कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी मतांनी निवडून दिले. नव्या-जुन्यांना एकत्र घेऊन पाच वर्षे चांगले काम करुन दाखवू.’
प्रा. पी. डी. पाटील यांनी स्वागत केले. ज्येष्ठ सभासद ईश्वर शिंत्रे व दुंडाप्पा जाधव यांच्या हस्ते डॉ. शहापूरकर, श्री. चव्हाण यांच्यासह नूतन संचालकांचा सत्कार झाला. संचालक अॅड. दिग्विजय कुराडे यांनी आभार मानले.
--------------
तमाशा थांबला तर...
डॉ. शहापूरकर म्हणाले, ‘राजकारण म्हणून कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. त्यांना दरमहा योग्य पगार दिला जाईल. कर्ज काढून हा पगार देणार आहे. त्यामुळे कामात कुचराई चालणार नाही. अन्यथा कायदेशीर अॅक्शन घेतली जाईल. तसेच निवृत्त कामगारांचे देण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यांचीही रक्कम दिली जाईल. पण, तिथला तमाशा थांबला तर हे शक्य आहे. या प्रस्तावाचा निवृत्त कामगारांनी विचार करावा.’