आंबोली महामार्ग करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली महामार्ग करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या
आंबोली महामार्ग करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या

आंबोली महामार्ग करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या

sakal_logo
By

64469
------------------------------------
आंबोली महामार्ग करताना
शेतकऱ्यांना विश्वासात घ्या
आमदार मुश्रीफ यांची सूचना : गडहिंग्लज तहसील कार्यालयात बैठक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा-आंबोली हा राष्ट्रीय महामार्ग बांधताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करावे, असेही त्यांनी सांगितले.
येथील तहसील कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाबरोबर बैठक झाली. श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘हा रस्ता बीओटी तत्त्वावर बांधला जात नसून तो केंद्र सरकारच्या निधीमधून होणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील चार गावांच्या हद्दीतील सव्वा किलोमीटरचे भूसंपादन होणार आहे. आजरा तालुक्यातील अकरा गावांच्या हद्दीतील साडेसहा किलोमीटरचे भूसंपादन होणार आहे. गडहिंग्लज शहरांमधून तो दहा मीटरने काँक्रिटीकरण, दोन्ही बाजूला साडेचार मीटरने डांबरीकरण व गटारी या मापानुसार जाणार आहे. केंद्र सरकारच्या भूसंपादन नियमानुसार जमिनीची भरपाई मिळणार आहे.’
बाधित शेतकऱ्यांतर्फे संपत देसाई, रामगोंडा पाटील म्हणाले, ‘महापुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवा. नवीन रस्त्याचा नकाशा व बाधित क्षेत्राची नेमकी अधिसूचना गावचावड्यांवर जाहीर करावी. तुटलेल्या झाडांच्या बदल्यात भौगोलिक वैविधतेनुसार वृक्षारोपण करावे. जमीन संपादनावेळी दोन्ही बाजूंच्या रस्त्याची मोजणी करून संबंधित शेतकऱ्यांना माहिती द्या. टोल नाक्यांवर स्थानिक वाहनांना सूट द्या व तिथे बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना कामावर घ्यावे.’
चर्चेमध्ये केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई, प्रकाश मोरुस्कर, सिद्धार्थ बन्ने, दयानंद खन्ना, अमरनाथ घुगरी, उमेश मोहिते, राजू मोळदी, अशोक कमते, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुधाळे, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विवेक काळे, गटविकास अधिकारी शरद मगर, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे आदींनी सहभाग घेतला.
-------------
मंत्री गडकरींकडे पाठपुरावा करू
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘शेतकऱ्यांची टॅगिंग न केलेली झाडे तोडली असतील तर त्यांची भरपाई तसेच भूसंपादनामध्ये जास्तीत-जास्त भरपाई यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात पाठपुरावा करू.’