गुळ सौदे बंदी रोखण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळ सौदे बंदी रोखण्याचे आव्हान
गुळ सौदे बंदी रोखण्याचे आव्हान

गुळ सौदे बंदी रोखण्याचे आव्हान

sakal_logo
By

गूळ सौदे बंदी रोखण्याचे आव्हान
शेतकरी, व्यापाऱ्यांपुढे पेच; कोल्हापुरी गुळाच्या लौकीकाला बाधा
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : जिल्ह्यातील विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेला कोल्हापूरचा गूळ उद्योग टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. तरीही एका गूळ हंगामात अडीचशे कोटींची उलाढाल होते. अशा लौकीकप्राप्त गूळ बाजाराला सौदे बंद पाडण्याचे ग्रहण यंदा लागले. काही मोजक्या घटकांकडून सौदे बंद पाडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यात शेतकरी, अडते, व्यापारी, माथाडीसह अनेक घटकांचे नुकसान होत आहे. हे चित्र बदलण्याचे बाजार समितीपुढे सध्या आव्हान आहे.
जिल्ह्यातील विविध नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीतील उसापासून पारंपरिक पद्धतीने गूळ बनवतात. कोल्हापुरी अस्सल गूळ चविष्ट, टिकाऊ व आरोग्यदायी असल्याने त्याला भौगोलिक उपदर्शन मिळाले. गेल्या दहा वर्षांत मात्र गुऱ्हाळघरांना अपुरे मनुष्यबळ, वीज दरवाढ, बाजारपेठेत सतत पडणारे भाव, वाढता उत्पादन खर्च अशा विविध समस्यांमुळे गुऱ्हाळघरे बंद पडली. जेमतेम २०० गुऱ्हाळघरांवर तयार होणारा गूळ शाहू मार्केट यार्डातील बाजारपेठेत सौद्यात विकताना त्याला भाव कमी मिळतो. यावरून शेतकरी व व्यापारी वाद होताना दरवर्षी गूळ सौदे बंद पडत आहेत.
---------------
चौकट
शेतकऱ्यांचे असे होते नुकसान
जिल्ह्यातील साखर कारखाने २८०० ते ३००० एफआरपी देतात. गुळासाठी किंमत काढल्यास केमिकल किंवा बिगर केमिकल गुळासाठी दीड टन उसाचे एक आदन काढले जाते किंवा एका रात्रीत नऊ टन उसाची चार आदने काढली जातात. यात कच्चा माल, मजुरी व इंधन खर्च वाढला आहे. त्यामुळे एका आदनासाठी येणारा खर्च सहा हजार रुपये धरला तर बाजारपेठेत प्रत्यक्ष गुळाला निम्मा भाव किंवा त्यापेक्षा किंचित जास्त मिळतो. म्हणजे एका आदनाला तीन ते चार हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होते. रात्रीच्या चार आदनांसाठीचे १२ ते १३ हजार रुपयांचे नुकसान होते. असे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी गुळाला चांगला भाव मागत आहेत.
--------------
असा व्यापारी फटका
कोल्हापुरातील ८० टक्के गूळ गुजरात बाजारात जातो. गेल्या दहा वर्षांत मात्र कोल्हापूरसह पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली ग्रामीण भागात गुऱ्हाळघरे व गूळ निर्मिती वाढली. तेथील गूळही गुजरातलाच पाठवला जाऊ लागला. याच वेळी हरियाणा, चंदिगड, लखनौचा गूळ गुजरातमध्येच येऊ लागला. तेथील गुळाचा भाव महाराष्‍ट्राच्या गूळ भावाच्या तुलनेत २० ते २५ टक्के कमी आहे, अशा स्वस्तातील गुळाची खरेदी गुजरातमध्ये वाढली. त्यामुळे उत्तम प्रतीच्या कोल्हापुरी गुळाचा भाव जास्त असल्याचे भासवले गेले. तरीही चोखंदळ ग्राहकांकडून अद्याप कोल्हापुरी गूळ घेतला जातो; मात्र गुजरातमधून मागणी कमी झाल्याचे सांगत व्यापारी सरासरीपेक्षा जास्त भाव येथे देऊ शकत नसल्याचे सांगत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
----------------
बाजार समितीने हे करायला हवे...
- मंड्या, सांगली, कराड येथील बाजारपेठेतील गूळ गुजरातमध्ये कोल्हापूरचा म्हणून विकण्याचा प्रकार घडतो. याला आळा घालावा.
- कोल्हापुरी गूळ गुजरातमध्ये पाठवण्याबरोबरच अन्य राज्यातील खाद्य संस्कृतीत गूळ पोहोचवावा
- सौदे बंद पाडणाऱ्यावर बाजार समितीने ठोस कारवाई करावी
- मागण्यांबाबत सौदे झाल्यानंतर चर्चा करावी; मात्र सौदे बंद पाडू नयेत यासाठी नियमांची अंमलबजणी कडक करावी.
(पूर्वार्ध)