‘मेन राजाराम’चे नाव प्रॉपर्टी कार्डला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मेन राजाराम’चे नाव प्रॉपर्टी कार्डला
‘मेन राजाराम’चे नाव प्रॉपर्टी कार्डला

‘मेन राजाराम’चे नाव प्रॉपर्टी कार्डला

sakal_logo
By

‘मेन राजाराम’चे नाव प्रॉपर्टी कार्डला
पालकमंत्री केसरकरांची ग्‍वाही; अतिरिक्त सुविधाही देणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २४ : भवानी मंडपातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्‍कूलचा सर्वांगीण विकास केला जाईल. शाळेची इमारत हेरिटेज असल्याने त्याचा विचार करून अतिरिक्‍त सुविधा दिल्या जाणार आहेत. शाळेची नोंद मालमत्ता पत्रकी (प्रॉपर्टी कार्ड) करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्‍वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
‘मेन राजाराम’च्या स्‍थलांतराबाबतचे वक्‍तव्य केसरकर यांनी केले होते. यानंतर कोल्‍हापुरात सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करत स्‍थलांतराच्या निर्णयाला विरोध केला. यानंतर केसरकर यांनी बुधवारी मेन राजारामचे स्‍थलांतर होणार नसल्याचे स्‍पष्‍ट केले आणि आज जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर सविस्‍तर भूमिका स्‍पष्‍ट केली.
ते म्‍हणाले, ‘‘भवानी मंडप येथील आहे त्याच इमारतीत मेन राजाराम हायस्‍कूल व ज्युनिअर कॉलेज सुरू राहणार आहे. ही हेरिटेज इमारत असल्याने त्याठिकाणी अन्य सुविधा निर्माण करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नवीन जागा बघायला सांगितली आहे. अधिकच्या सुविधा नवीन जागेवर देण्यात येतील.’’ त्यांनी इंग्लिश मीडियम स्‍कूल करण्याचा विचारही बोलून दाखवला.
अन्य एका कार्यक्रमात श्री. केसरकर म्हणाले, ‘‘मेन राजाराम हायस्कूलमध्ये हॉटेल सुरू कऱण्याची माझी इच्छा नाही. शालिनी पॅलेस हॉटेल बंद पडले; मी कशाला नवीन हॉटेल सुरू करू? शालिनी पॅलेस सुरू झाले तरी पर्यटकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. आपण शाहू महाराजांचे नाव घेतो. आपली एकी ही विकासासाठी असली पाहिजे. नकारात्मक गोष्टींसाठी असू नये.’’ भवानी मंडप परिसरातील सर्व सरकारी इमारती रिकामी केल्या आहेत. तेथील १८ पैकी ११ कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित केली आहेत. मेन राजाराम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल, हे आम्ही पाहणार आहोत. शेतकरी बझार इमारतीलाही भेट दिली. त्याचाही विचार करत आहेत, पण त्याआधी स्वच्छतागृह, पार्किंग या प्राथमिक सुविधाही पुरवणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे २५ वर्षे सत्ता होती; त्यांना या सुविधा देता आल्या नाहीत. आम्ही या सुविधा देण्याचा प्रयत्‍न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.’’
ऐन दिवाळीत केसरकर यांनी जिल्‍हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांसोबत मेन राजाराम हायस्‍कूलची पाहणी केली. यानंतर दुसऱ्‍याच दिवशी शाळा स्‍थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या. महापालिकेच्या बंद असलेल्या शाळांमध्ये मेन राजारामचे स्‍थलांतर करण्याचे प्रयत्‍न सुरू होते. याबाबतचे वृत्त प्रसिध्‍द झाल्यानंतर लोकांचा विरोध सुरु झाला. यावर त्यांनी जिल्‍हा नियोजनमधून नवीन इमारत बांधणार असल्याचे स्‍पष्‍ट केले. या निर्णयाला आजी, माजी विद्यार्थी, तसेच नागरी कृती समितीने कडवा विरोध केला.
मेन राजारामप्रश्‍‍नी मागील तीन आठवड्यांपासून आंदोलन सुरु आहे. सरकराला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. दरम्यान, आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मेन राजारामबाबत कोल्‍हापूरकरांच्या भावना पोहोचवल्या. यावर अशाप्रकारचे स्‍थलांतर होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले, मात्र लेखी हमी दिली नव्‍हती. आंदोलन चिघळत चालल्यानंतर केसरकर यांनीच बुधवारी (ता.२३) रात्री उशिरा मेन राजारामचे स्‍थलांतर होणार नसल्याचे लेखी स्‍पष्‍ट केले.